हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव, बोथी परिसरात पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 02:19 PM2020-02-27T14:19:28+5:302020-02-27T14:30:29+5:30
यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वारंगा फाटा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव बोथी परिसरामध्ये गुरुवारी ( दि. २७ ) पहाटे ३:३८ व ३:५० वाजेच्या दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी ( दि. २७ ) पहाटे ३:३८ व ३:५० वाजेच्या दरम्यान कळमनुरी तालुक्यातील बोथी, बऊर, माळधावंडा, दांडेगाव व परिसरामध्ये जवळपास दोन ते सेकंदाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तर भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे बोथी येथे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा असून येथे मोठ्या प्रमाणावर मुले आणि मुली निवासी असतात.भुकपाच्या धक्क्याने नागरिकांत एकच धांदल उडाली होती,सुदैवाने कोणतीही जीवित हनी झाली नाही.
येथील शिवाजी खुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साखर झोपेत असताना भूकंपाचा धक्का जाणवला.भूगर्भातून गूढ आवाज ऐकू येत असल्याने भीतीने ग्रामस्थ घराबाहेर पडले.यापूर्वीही बोथी येथे भूकंपाचा धक्का जाणवला होता तेव्हापासून भूकंप म्हटले की ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण होते असे शिवाजी खुडे यांनी सांगितले.भूकंपाची माहिती घेण्यासाठी कळमनुरीचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल फोन उचलला नाही .त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.