घरांना आग लागल्याने लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:49 AM2019-03-06T00:49:38+5:302019-03-06T00:49:45+5:30
हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
जयपूरवाडी येथील श्रीराम कºहाळे यांच्या लाकडी माळवदाच्या घराला आग लागली. घरातील देवाच्या देव्हाऱ्यातील दिव्याने लाकडाच्या खांबाला आग लागल्याचा अंदाज आहे. त्यानंतर आगीने उग्र रुप धारण केल्याने पाहता पाहता शेजारील नागोजी सूर्याजी गाढे यांच्याही घराला आग लागली. या आगीत श्रीराम कºहाळे यांचे माळवदाचे घर कोसळल्याने घरातील सर्व साहित्य माळवदाखाली दबले गेले. त्यात कºहाळे यांचे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. तर नागोजी सूर्याजी गाढे यांचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आग विझविण्यासाठी सर्व गाव एकवटले होते. मात्र गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी उपलब्ध नव्हते. ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरुन पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी १ वाजता दाखल झाले. अग्निशमन दलाचे पथक येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी आग विझवली होती. येथील परिसरात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जयपूर वाडीमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही तर, आग विझवण्यासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. याही परिस्थितीत आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
शॉटसर्किटमुळे आखाडा जळून खाक
४शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भवानीच्या माळाजवळील शेतात ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान शॉटसर्किटमुळे पेट घेऊन आखाड्यातील विविध शेतीपयोगी औजारे जळून खाक झाली आहेत. कुठलीही जीवित हानी झाली नाही. शिरडशहापूर येथील गट. क्र. ५३५ मधील चंद्रहार लक्ष्मण वाहटळे यांच्या शेतातील आखाड्याजवळील विजेच्या तारांचे घर्षण होऊन धुऱ्यावरील गवताने पेट घेतला. पाहता पाहता सर्वत्र आग लागली. यात आखाड्याने पेट घेतला. आखाड्यातील विविध शेती औजारे, ठिबक संच, पाईप इ. साहित्य जळून खाक झाले असून जवळपास एक लाख रुपयांच्या वर नुकसान झाले आहे.