मंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 02:27 PM2021-07-10T14:27:26+5:302021-07-10T14:35:03+5:30
Minister Varsha Gaikwad accident News : प्रसंगावधान राखून मंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवल्याने पुढील अनर्थ टळला.
हिंगोली : शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसल्याची घटना शहरातील पिपल्स बँकेजवळ १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड ९ जुलैपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती, कोरोना स्थितीचा आढावा व कृषी विभागाची आढावा बैठक झाली. ( Minister Varsha gaikwad's car in the convoy was hit by a speeding tempo incident in Hingoli )
१० जुलै रोजी सकाळी आकरा वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. ताफा पिपल्स बँकेजवळ आला असता याच वेळी मोंढ्यातून भरधाव वेगाने एक पिकअप टेम्पो मुख्य रस्तावर येत होता. काही कळायच्या आत पालकमंत्री गायकवाड यांच्या वाहनावर टेम्पो धडकला. प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही.
घटनेनंतर पोलिसांनी पीकअप टेम्पो चालकास ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी केली. दरम्यान, दुपारी २ वाजेपर्यंत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पिक अप वाहनचालकाविरूद्ध गुन्हा नोंद झाला नव्हता.