दुसऱ्या दिवशीही मंत्र्यांचा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:16 PM2019-05-10T23:16:15+5:302019-05-10T23:16:27+5:30
टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सलग दुसºया दिवशी जिल्ह्यात पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन टंचाईवर मात करु, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सलग दुसºया दिवशी जिल्ह्यात पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन टंचाईवर मात करु, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.
आज पालकमंत्र्यांनी हिंगोली तालुक्यातील रायपूरवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून सद्य:स्थितीत पाण्याची उपलब्धता, चालू टँकर आणि अधिग्रहण केलेल्या बोअर-विहिंरीची माहिती घेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तर गावात टँकर आल्यानंतर नागरिकांनी घाई-गडबड न करता पाणी भरुन घ्यावे. पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, अशा सूचनाही दिल्या.
हिंगोली तालुक्यातील माळसेलू ग्रामस्थांच्या कांबळे यांनी समस्या जाणून घेतल्या. गावात टँकरच्या चार खेपा केल्या जातील आणि वन्यजीव प्राण्यांपासून गावाला होणाºया त्रासाबद्दल वन विभागास सूचना केल्या जातील. माळसेलू गावाने ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले.
सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावास कांबळे यांनी भेट देऊन टंचाईग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. याठिकाणी दोन बोअरचे अधिग्रहण केल्याने गावातील पाणीप्रश्न सुटल्याचे ग्रामस्थांनी कांबळे यांना सांगितले. तर त्यांनी ताकतोडा येथेही जाऊन टंचाईबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दौºयात विविध पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके, ब्राह्मणवाडा तांडा या गावांमध्ये पाणीटंचाई असून या गावांना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट दिली. येहळेगाव सोळुंके व रामेश्वर येथील ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्न मांडला. पालकमंत्र्यांनी त्वरित टँकर सुरू करण्याचे आदेश तहसीलदार आणि बीडीओंंना दिले. शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या कुटुंबांचे ब्राह्मणवाडा येथे जाऊन पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. यावेळी माजी खा. शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, सूरजितसिंग ठाकूर, नगरसेवक गणेश बांगर, शरद पाटील, दिलीप सांगळे, संतोष देशमुख, बीडीओ डॉ.सुधीर ढोंबरे, सूरज श्यामशेट्टीवार, आनंद शिंदे, माधव भुजावळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र
हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे हे ९ मे रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौºयावर आले आहेत. सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेत त्यांनी मुक्काम केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी जाणून घेतल्या. जेवणाची व्यवस्था नसल्याने एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.
यावेळी परिसरातील शेतकºयांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. पाणी प्रश्न, रोहयो, चारा छावण्या आदी समस्यांवर उपाययोजना करण्याचे अश्वासन दिले. भविष्यात चाराप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकºयांनी मागणी केल्यास तातडीने चारा छावण्या सुरु केल्या जातील.
काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने तेथे फिल्टरचे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असून याबाबत प्रशासनाला सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोहयोची कामे तातडीने सुरु केली जातील. प्रत्येक गावातून किमान दहा कामे सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.