अपात्र संचालकांना मंत्र्यांचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:33 AM2018-05-05T00:33:35+5:302018-05-05T00:33:35+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार अपात्र संचालकांना सहकार व पणन मंत्र्यांनी दिलासा दिला असून अपात्रतेच्या कारवाईला अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार अपात्र संचालकांना सहकार व पणन मंत्र्यांनी दिलासा दिला असून अपात्रतेच्या कारवाईला अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातील संचालक सुमित्रा नरवाडे, अमोल हराळ, संजय देशमुख, गोदावरी बाबाराव शिंदे यांच्याविरोधात संचालक दत्तराव टाले यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील केले होते. सदर संचालक विद्यमान ग्रा.पं.चे सदस्य नाहीत. त्यामुळे त्याचे पद रद्द करावे, अशी तक्रार होती. यासंबंधी जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेवून ग्रा.प.मतदार संघातील चारही संचालकाना अपात्र घोषित केले होते. या विरोधात अपात्र संचालकांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे आव्हान दिले होते. पंरतु या ठिकाणी सदर संचालकांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे अपात्र संचालकांनी राज्य शासनाचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे दाद मागितली होती. या अपिलावर सहकारमंत्र्यांनी २ मे रोजी सुनावणी घेवून सदर अपिलाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत संचालक सुमित्रा नरवाडे, अमोल हराळ, संजय देशमुख, गोदावरी शिंदे यांच्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली. तसे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले असून अंतिम निर्णय लागपर्यंत किमान चारही संचालक पदावर कायम राहणार आहेत.
काँग्रेसच्या संचालकासाठी मुटकुळे यांचे प्रयत्न
येथील बाजार समितीच्या चार संचालकांवर अपात्रतेची कारवाई झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे जि.प.चे. सभापती संजय देशमुख, माजी जि.प.सदस्य चंद्रकांत हराळ यांचे चिरंजीव, माजी पं. स. सदस्य बाबाराव शिंदे यांच्या पत्नी हे तीन तर भाजपच्या सुमित्रा नरवाडे अशा चार संचालकांचा समावेश होता. या चारही संचालकांना दिलासा देण्यासाठी सुरवातीपासूनच आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पडद्यामागून बरेच प्रयत्न केले. त्या प्रयत्नातूनच सहकारमंत्र्यांनी चार संचालकांना दिलासा दिला. काँग्रेसच्या संचालकासाठी भाजपच्या आमदाराने प्रयत्न केल्याने सहकाराचे राजकारण कुणाच्या फायद्याचे ठरणार? असा प्रश्न उभा होत आहे.