अल्पसंख्यांकांना योजनांचा लाभ द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:12 AM2018-12-14T01:12:48+5:302018-12-14T01:15:42+5:30
अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गतच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.
हिंगोली : अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गतच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.
जिल्हा कचेरीत डिपीसी सभागृहात १३ डिसेंबर रोजी त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, जि.प.चे अति.मुकाअ बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. शेख म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गत केवळ मुस्लिम समाजाचा समावेश नसून यामध्ये जैन, शिख, बौध्द, ख्रिश्चन आदी समाज आहे. या सर्व समाजातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी अल्पसंख्यांक आयोग प्रयत्नशील आहे. वक्फ बोर्डाला पूर्णवेळ अधिकारी देवून जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतीक्रमण झाल्यास अशा लोकांवर त्वरीत कठोर कारवाई करावी. अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांसाठी निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रशासनाने सोडवावा. जिल्ह्यातील ऊर्दू शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. उर्दू शाळांमध्ये मराठीचे तज्ज्ञ शिक्षक नेमावेत. जिल्ह्यात एका बालिकेवर अत्याचार झाला होता, अशा घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या घटनेतील दोषींवर उचित कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. बोगस मदरशांना निधी दिल्याच्या तक्रारी आहेत. तसे असल्यास मदरशासह संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, जिल्ह्याला ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, तो निधी त्याच प्रयोजनासाठी खर्च होईल याबाबत सर्व संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.
वसतिगृहांचे काम विद्युतीकरणासाठी रखडले
जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधीत वाढ व्हावी यासाठी उर्दू शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या, स्वच्छतागृहे करण्याचे आवश्यकत आहे. तसेच घरकुल योजनेअंतर्गत १ हजार १७७ अल्पसंख्यांक समाजातील कुंटुंबाची निवड करण्यात आली आहे. तसेच ४२ अंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी ३८ पूर्ण झाल्याची जि. प. चे अति. मुकाअ बनसोडे यांनी दिली. हिंगोली आणि कळमनुरी येथे ७६२.०९ लाख खर्च करुन अल्पसंख्यांक मुलांचे वसतिगृह बांधले असून फर्निचर, विद्युतीकरणाचे काम सुरु असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घुबडे यांनी दिली. यावेळी साबांचे कार्यकारी अभियंता घुबडे, शिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के, न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील आदी उपस्थित होते.