संत नामदेवांचे वंशज म्हणून सरकारची दिशाभूल; नर्सी येथील मंदिर समिती अध्यक्षांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:38 PM2020-07-02T20:38:08+5:302020-07-02T20:38:36+5:30
इतर दिंड्यांना बसने जाण्याची परवानगी मिळाली. या दिंडीलाच का मिळाली नाही, असा प्रश्न संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला.
हिंगोली : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे झाला. ते संत ज्ञानेश्वर यांच्या समकालीन व विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त म्हणून सर्वपरिचित असताना शासनाने पालखीला परवानगी नाकारली. पंढरपुरात नामदेवांचे वंशज म्हणून काहींनी दिशाभूल चालविल्याने त्याला शासन बळी पडले. इतर दिंड्यांना बसने जाण्याची परवानगी मिळाली. या दिंडीलाच का मिळाली नाही, असा प्रश्न संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला.
राज्यामध्ये सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षी पायदळ दिंडी सोहळ्याला प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली. राज्यभरातील काही प्रमुख पालख्यांनाच परवानगी देऊन त्या समारंभपूर्वक पंढरपूर येथे नेण्यासाठी राज्य शासनाकडून शिवशाही बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र यामध्ये श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालखीला परवानगी देण्यात आली नाही. संत नामदेव यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. अशा या थोर संताच्या पालखीला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी परवानगी न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिंदे म्हणाले, परवानगीची मागणी येथील संस्थान व स्थानिक लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे वारंवार करूनही डावलण्यात आले. प्रमुख संतांच्या पालखीचे स्वागत करण्याचा मान मागील अनेक वर्षांपासून नर्सी येथील संत नामदेवाच्या पालखीला आहे. मात्र हा मान पंढरपूर येथील नामदेवाचे वंशज असल्याचे सांगून काहीजण दिशाभूल करीत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी एक बैठक झाली. वारकरी संप्रदायातील मंडळी आगामी काळात याप्रश्नी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
...अखेर जीपमधून नेल्या पादुका
३0 जून रोजी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेत केवळ तीन वारकरी नामदेवांच्या पादुका घेऊन एका खाजगी जीपमधून पंढरपूरकडे रवाना झाले. संत नामदेव महाराजांच्या पालखीची मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. संत नामदेवांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग असतो. या पालखी सोहळ्याचा तीन ठिकाणी भव्य रिंगण सोहळा होतो, तर पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराज पालखीकडून पुष्प प्रदक्षिणा करण्यात येते.