बालक नातेवाईकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:50 PM2017-12-11T23:50:08+5:302017-12-11T23:50:22+5:30
शहरातून अचानक बेपत्ता झालेला अमोल राऊत या बालकाचा शोध लागला असून तो सध्या नातेवाईकाकडे सुखरूप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातून अचानक बेपत्ता झालेला अमोल राऊत या बालकाचा शोध लागला असून तो सध्या नातेवाईकाकडे सुखरूप आहे. बडनेरा येथील रेल्वे पोलिसांनी १० डिसेंबर रोजी हिंगोली शहर पोलीस व नातेवाईकांना संपर्क केला. स्वत:हूनच मित्रांसोबत फिरत गेलो होतो, असे अमोल सांगत आहे.
हिंगोलीतील अमोल दादाराव राऊत (वय १०) हा ९ डिसेंबर रोजी शाळेत गेला, परंतु तो घरी परतलाच नाही. वडील दादाराव राऊत यांनी हिंगोली शहर ठाण्यात मुलास पळवून नेल्याची तक्रारही दिली होती. पोलीस यंत्रणा, नातेवाईक तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनीही त्याचा शोध घेतला. अखेर तो रविवारी बडनेरा रेल्वेस्थानकात सापडला. तेथील पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क केला होता. ९ डिसेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर अमोल हिंगोली येथे सुरू असलेल्या संत नामदेव कवायत मैदानावर तो क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. काही शालेय खेळाडूंसोबत मैत्री झाली. तो त्यांच्यासोबतच निघून गेला. बडनेरा रेल्वेस्थानकावर काही क्रीडा स्पर्धेच्या शिक्षकांनी बालकाची विचारपूस केली असता तो चुकून रेल्वेत आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क करत बालकास त्यांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी हिंगोली पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर मुलास नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
शाळेच्या प्रांगणातून बालकास कोणी पळवून नेले नसून तो स्वत:हूनच त्याच्या मित्रांसोबत निघून गेला. त्यास नातेवाईकांच्या स्वाधीन केले असून सध्या अमोल सुखरूप आहे, असे संस्थेचे सचिव अनिलकुमार भारूका यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.