मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:43 AM2018-11-25T00:43:20+5:302018-11-25T00:43:53+5:30
राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतील का? या अनुषंगाने मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतील का? या अनुषंगाने मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्र. १२ पोलिस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आले होते. त्यानंतर हिंगोली शहर ठाण्यात तत्कालीन सहाय्यक समादेशक जयराम पुष्ठपाटे, सूत्रधार पोलीस चालक नामदेव ढाकणे, एस.एस.जी. सॉफ्टवेअर कंपनीचे आॅपरेटर शिरीष औधूत, पोलीस कर्मचारी शेख महेबूब शेख आगा व गुण वाढवून सेवेत समाविष्ट होणाऱ्या २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आला. मदणे यांनी सदर प्रकरणाचा कसून तपास करत भरती घोटाळा प्रकरणातील आरोपी पोलिसांना कर्तव्यावरून ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यामुळे अनेक उलगडे झाले. विशेष म्हणजे डीवायएसपी राहुल मदने यांनी चौकशीसाठी एसआरपीचे तत्कालीन समादेशक व माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामेदव मिठ्ठेवाड यांना अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली. अर्थपूर्ण चिरीमिरीतूनच ही भरती झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. उत्तर पत्रिका व संगणकातील बाबी उघड झाल्यानंतर मदने यांनी मिठ्ठेवाड यांना अटक केली. मिठ्ठेवाड यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांची दिवसभर डिवायएसपी मदने यांच्या दालनात चौकशी केली जात आहे. तर रात्रीच्या सुमारास हिंगोली शहर ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले जात आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच चौकशी सुरू असून काही बाबी स्पष्ट झाल्या असल्या तरीही अद्याप महत्त्वाचा धागा-दोरा हाती लागला नाही, असे डीवायएसपी मदने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नांदेड पोलीस भरती घोटाळ्यानंतर फुटले होते बिंग...
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस भरती २०१३, २०१४ व २०१७ या कालावधीत उमेदवारांना निकष डावलून पोलीस भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले होते. या पोलीस भरतीचे बिंग फुटले अन् घोटाळा समोर आला. नांदेड पोलीस भरती घोटाळ्यानंतर हिंगोलीतही हा घोटाळा झाल्याने या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.