आमदार संतोष बांगर यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांनाच घेतले फैलावर; ऑडीओ व्हायरल
By विजय पाटील | Published: August 30, 2022 02:38 PM2022-08-30T14:38:06+5:302022-08-30T14:40:21+5:30
१०२ रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नी झाले आक्रमक, राज्यातील २९ जिल्ह्यातील चालकांचे शिष्टमंडळ आ.संतोष बांगर यांना भेटण्यासाठी हिंगोलीत आले होते.
हिंगोली : राज्यभरातील १०२ रुग्णवाहिकांवर असलेल्या चालकांची पिळवणूक होत असून आम्हाला शासन निर्णयाप्रमाणे १९ हजार ९०० रुपये वेतन द्यावे, मागील सहा महिन्यांचे वेतन अदा करावे या मागणीसाठी या चालकांनी आ.संतोष बांगर यांची भेट घेतली. मात्र संपर्क करूनही प्रतिसाद देत नसलेल्या आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.नितीन आंबडकर यांना नंतर आ.बांगर यांनी चांगलेच फैलावर घेतले.
राज्यातील २९ जिल्ह्यातील चालकांचे शिष्टमंडळ आ.संतोष बांगर यांना भेटण्यासाठी हिंगोलीत आले होते. त्यांनी सांगितले की, आम्हाला शासनाने आता एनआरएचएममधून नोकरीचे आदेश दिले पाहिजे. आम्ही कंत्राटदारांकडे अनेक वर्षांपासून काम करतो. मात्र कुठे आठ हजार तर कुठे दहा हजारांपर्यंत वेतन दिले जाते. कंत्राटदार मात्र आमच्या नावाने १९ हजार ९०० रुपये उचलतात. एवढे करूनही मागील सहा महिन्यांपासून आम्हाला वेतनच अदा केले नसल्याचे गाऱ्हाणेही त्यांनी बांगर यांच्याकडे मांडले.
यानंतर आ.संतोष बांगर यांनी आयुक्त डॉ.नितीन आंबडकर यांच्याकडे हा प्रश्न मांडण्यासाठी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे हा प्रश्न आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू. आगामी एक महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर राज्यभर एकही रुग्णवाहिका कामावर जाणार नाही. एकाच दिवशी संप पुकारू. तसेच डॉ. आंबडकर यांचीही तक्रार करून संबंधितांना तेथून हटविण्याची मागणी धसास लावू. अन्यथा सेना स्टाईलने हा प्रश्न सोडवू, असे त्यांनी सांगितले. यानंतर काही वेळाने डॉ.आंबडकर यांनी बांगर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी आंबडकर यांना चांगलेच फैलावर घेतले. राज्यातील सर्व कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करून या चालकांचे वेतन मिळावे. त्यांना यापुढे १९ हजार ९०० रुपये वेतन अदा व्हावे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.