कॅन्सरग्रस्त मुलाला आ. संतोष बांगर यांनी दिला मदतीचा हात
By विजय पाटील | Published: January 21, 2024 08:24 PM2024-01-21T20:24:28+5:302024-01-21T20:24:39+5:30
डॉक्टरांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करीत मुलाच्या उपचारासाठी सूचना दिल्या.
हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील एका ९ वर्षीय मुलाला हाडाचा कॅन्सर झाल्याने मदतीसाठी या मुलाच्या आई वडिलांनी आ.संतोष बांगर यांच्याकडे धाव घेतली. बांगर यांनी रोखीने मदत करतानाच छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातील डॉक्टरांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करीत मुलाच्या उपचारासाठी सूचना दिल्या.
पिंपळदरी येथील शेख एकबाल व समीनाबी या दाम्पत्याचा ९ वर्षाचा छोटा मुलगा शेख अल्तमस याला तीन महिन्यांपूर्वी पायाला गाठ आली. त्याला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. गाठ तपासणीसाठी पाठविली. त्याचा अहवाल आला आणि शेख इकबाल व समीनाबी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. छोट्या अल्तमसला हाडाचा कॅन्सर असल्याचे निदान समोर आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खर्च करायचा कुठून? याची चिंता पडली.
तेव्हा अल्तमसला घेवून त्याचे वडील आ. संतोष बांगर यांच्याकडे आले. एवढ्या लहान मुलाला आजाराने घेरल्याचे कळताच बांगरही सुन्न झाले. त्यांनी लागलीच छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात फोन करून सर्व परिस्थिती डॉक्टरांना सांगितली. त्याचा योग्य तो उपचार करा. त्याच्या केमोचा खर्च मी देतो असे डॉक्टरांना सांगितले... अल्तमसच्या डोक्यावरून हात फिरवून त्याच्या खिशात देखील पैसे ठेवले...शासकीय मदत देखील मिळवून देण्याचाही शब्द दिला.