याला म्हणतात आमदार... रेमडेसिविर इंजेक्शनसाठी स्वत:ची 90 लाखांची एफडी मोडली अन् जनतेला सेवा दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:30 AM2021-04-24T04:30:02+5:302021-04-25T09:58:48+5:30
हिंगोली : सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. याच चाकोरीत रेमडेसिविर इंजेक्शनही अडकले. हे न ...
हिंगोली : सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. याच चाकोरीत रेमडेसिविर इंजेक्शनही अडकले. हे न पाहवल्याने आमदार संतोष बांगर यांनी स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले. मागील दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच औषधांचा तुटवडा हीसुद्धा गंभीर समस्या बनली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव महत्त्वाचं मानून आमदारांनी आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्शन निर्माण केलाय.
सुरुवातीला ९०० रुपये दराने जवळपास पाचशे इंजेक्शन्स आणून आ. संतोष बांगर यांनी मोफत वाटले होते. मात्र नंतर या इंजेक्शन्सचा तुटवटा निर्माण झाला अन् दर वाढले. त्यानंतर १८०० रुपयांनी काही इंजेक्शन्स वाटले. नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात, म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या. अशातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कुणी सोसायचा म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. त्यातच आ. संतोष बांगर यांच्या कानावर ही बाब गेली. त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र, यातून काहीच मार्ग निघत नव्हता. यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील ९० लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली. त्यात त्यांना ५ ते ६ लाखांचे नुकसान सोसावे लागणार आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो आ. बांगर यांना मिळणार आहे. त्यातही ना नफा, ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही तूर्त उपलब्ध करून दिली आहे. आता दोन दिवसांत हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी आशा आहे.
दरम्यान, याबाबत आ. संतोष बांगर म्हणाले, सध्याचा कोरोनाचा काळ हा अतिशय वाईट आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे शक्य आहे, तेवढे करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोरोना वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनसाठीची अडचण दूर करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.