नर्सी संस्थानच्या विकासासाठी मनसेचा रास्तारोको
By विजय पाटील | Published: August 25, 2023 08:21 PM2023-08-25T20:21:00+5:302023-08-25T20:21:32+5:30
नर्सी (नामदेव) हे ठिकाण पर्यटनस्थळ तसेच श्री संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ म्हणून ही प्रसिद्ध आहे.
हिंगोली: तालुक्यातील नर्सी (नामदेव) येथे हिंगोली ते सेनगाव रस्त्यावर २५ रोजी मनसेच्या वतीने संत नामदेव मंदिर परिसरात असलेल्या असुविधा दूर करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
नर्सी (नामदेव) हे ठिकाण पर्यटनस्थळ तसेच श्री संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ म्हणून ही प्रसिद्ध आहे. येथे श्री संत नामदेव महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. मात्र त्या अनुषंगाने या ठिकाणी मंदिर परिसराचा विकास अद्यापपर्यंत झाला नाही. नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने येतात. मात्र आलेल्या भाविकांना सोयीसुविधा नाहीत. परिणामी, भाविकांची गैरसोय होत आहे.
येथे राज्यभरातील भाविक अस्थिविसर्जनासाठी येतात. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था करणे, पिंडविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, केश कर्तनालयासाठी वेगळी जागा देणे आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन महसूल मंडळ अधिकारी गजानन पारिसकर यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, ज्ञानेश्वर कामखेडे, दत्तराव देशमुख, नर्सी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे आदि उपस्थित होते.