'प्राचार्य खुर्ची खाली करा'; शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मनविसेनेकडून आंदोलन
By विजय पाटील | Published: July 24, 2023 03:21 PM2023-07-24T15:21:27+5:302023-07-24T15:21:39+5:30
एका आंदोलक युवकाने फिल्मीस्टाईल खांबावर चढून घोषणा देण्याचा प्रयत्न केला.
हिंगोली : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि उपप्राचार्यांची बदली झाली तरीही त्यांना कार्यमुक्त केले नसल्याने मनविसेच्यावतीने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
मनविसेच्यावतीने यासाठी आधीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांच्या आंदोलनाच्या धास्तीने प्राचार्यंनीही पोलिस अधीक्षक कार्यालयास निवेदन देवून बंदोबस्ताची मागणी केली. हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापकांची गेल्या वर्षभरापासून प्राचार्य व उपप्राचार्यांविरोधात ओरड आहे. प्राचार्य नाहकच त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. विशेषत: महिला प्राध्यापकांनीही तक्रारी केल्या होत्या. आता विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची तक्रार केली आहे. प्राचार्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध प्रकारचे शुल्क आकारून विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. प्राचार्य नाहकच त्रास देत आहेत, अशा आशयाची फलके हातात घेवून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. जोपर्यंत या प्राचार्यांना कार्यमुक्त केले जात नाही, तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाही इशारा मनसेच्या वतीने दिला आहे.
खांबावर चढण्याचा प्रयत्न
एका आंदोलक युवकाने फिल्मीस्टाईल खांबावर चढून घोषणा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर वीज प्रवाहित तारा असल्याने इतरांनी त्याला खाली खेचल्याने अनर्थ टळला.