मोडीलिपी अभ्यासकांना हिंगोलीत भूमिअभिलेखमध्ये सापडल्या १ हजार ८३ कुणबी नोंदी
By रमेश वाबळे | Published: October 25, 2023 07:45 PM2023-10-25T19:45:25+5:302023-10-25T19:45:56+5:30
मोडीलिपीतील कागदपत्रांचे वाचन आणि तपासणीचे काम २३ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयात सुरू झाले आहे.
हिंगोली : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाकडून मराठा कुणबी नोंदीची तपासणी सुरू आहे. येथील तहसील कार्यालयात २३ व २४ ऑक्टोबर रोजी मोडीलिपीतील कागदपत्रांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत भूमिअभिलेख कार्यालयात इसमवार नोंदवही नमुना ३३ मध्ये कुणबी म्हणून नोंद असलेल्या एक हजार ८३ नोंदी सापडल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा असून, त्यासाठी आंदोलन, उपोषणे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मराठा कुणबी नोंद असलेले पुरावे शोधण्याचे काम तहसील कार्यालय, भूमिअभिलेख विभागात सुरू आहे. तसेच मराठा समाजबांधवांनीही आपल्याकडील पुरावे प्रशासनाला दिले आहेत. मोडीलिपीतील कागदपत्रांचे वाचन आणि तपासणीचे काम २३ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयात सुरू झाले आहे. पुणे येथील मोडीलिपी अभ्यासक संजय गुजले जुन्या कागदपत्रांचे वाचन करीत असून, त्यामध्ये मराठा कुणबी नोंद असलेले पुरावे गोळा करण्यात येत आहेत. २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमीची सुटी असतानाही कागदपत्रे तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
२५ ऑक्टोबर रोजी भूमिअभिलेख कार्यालयात गुजले यांनी इसमवार नोंदवही, नमुना नंबर ३३ ची तपासणी केली. यात सायंकाळपर्यंत कुणबी म्हणून एक हजार ८३ नोंदी सापडल्या. यावेळी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक आर.डी. सिद्दमवार, राम जाधव आदींची उपस्थिती होती.दरम्यान, भूमिअभिलेख कार्यालयासह तहसीलमध्ये मराठा कुणबी नोंदीचा शोध आणि तपासणीचे काम शिल्लक आहे.