विशुद्ध भावनेने भक्ती केल्यास मोक्षप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:32 AM2021-02-11T04:32:12+5:302021-02-11T04:32:12+5:30
हिंगोली : आपण जेवण करता करता अनंत भव (जन्म) निघून जातात; पण विशुद्ध भावातून मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती आतापर्यंत आपण ...
हिंगोली : आपण जेवण करता करता अनंत भव (जन्म) निघून जातात; पण विशुद्ध भावातून मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती आतापर्यंत आपण केली नाही. असे असले तरी, एकदा तरी आपण विशुद्ध भावनेने जिनेंद्र प्रभूंची भक्ती केल्यास मोक्षाची प्राप्ती होते, असे उद्गार प. पू. श्रवण मुनिजी १०८ विशेष सागरजी महाराज यांनी काढले.
पुसेगाव येथील जैन भवनमध्ये आयोजित तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या मोक्ष कल्याणक महोत्सवप्रसंगी धर्मसभेला संबोधित करताना ते बोलत होते. प. पू. मुनिश्रींनी सांगितले की, जैन धर्मात २४ तीर्थंकर आहेत. आजपासून करोडो वर्षांपूर्वी जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांचा जन्म झाला होता. आयुष्याच्या शेवटी त्यांनी राजपट व परिवाराचा त्याग केला. त्यानंतर जैन मुनी दीक्षा ग्रहण केली. मुनी दीक्षा ग्रहण केल्यानंतर त्यांनी तप, साधना करून कैलासगिरी पर्वतावरून त्यांना मोक्षप्राप्ती झाली. या मोक्षकल्याणकचे औचित्य साधून जैन भवन, पुसेगाव येथील बाहुबली भगवान प्रांगणात १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी ‘श्रीं’चा अभिषेक व शांतिधारा संपन्न झाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी आचार्यश्रींची भक्ती व ४८ दीपक प्रज्वलित करून महाआरती करण्यात आली.
११ फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वाजून ३० मिनिटांनी अभिषेक, पूजन व सप्तऋषी विधान होणार आहे. नंतर प. पू. मुनिश्रींचे प्रवचन होणार आहे. सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी गुरुभक्ती व प. पू. मुनिश्री यांच्या जीवनदर्शनावर आधारित ‘चलो चले जसपूर’ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी वेदी शिलान्यास, पिंच्छी परिवर्तन व गुरू उपकार कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी अभिषेक व वास्तू विधान, दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी वेदी शिलान्यास विधी, १ वाजून ३० मिनिटांनी छायाचित्राचे अनावरण, दीपप्रज्वलन व मुनिश्रींचे पूजन, पादप्रक्षालन, १५ ग्रंथभेट, अतिथी सत्कार होणार आहे.