पुढील आदेश येईपर्यंत मोंढा बंदच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:08+5:302021-04-23T04:32:08+5:30
हिंगोली : जिल्ह्यासह परजिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील मोंढा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ...
हिंगोली : जिल्ह्यासह परजिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील मोंढा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.
मध्यंतरी म्हणजे १६ ते २१ यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे मोंढा बंदच ठेवण्यात आला होता. कोरोनाचे रुग्ण सर्वत्र आढळून येत आहेत. त्यामुळे मोंढा ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या; परंतु या वेळेत जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन येणे परवडत नाही, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील आदेशापर्यंत जिल्हा व परजिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी शेतीमाल मोंढ्यात आणू नये. कारण पुढील आदेश येईपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू, तूर, हळद, सोयाबीन, हरभरा आदी शेतीमालाची आवक चांगल्या प्रकारे होत होती; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही शेतकरी मोंढा येथे शेतीमाल घेऊन येत नव्हते. शासनाने सकाळी ११ वाजेपर्यंत मोंढा चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी ही वेळ सर्वच शेतकऱ्यांना सोयीची नव्हती. काही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारीही केल्या होत्या. जिल्ह्यासह परजिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे
शेतकऱ्यांची काळजी करत मोंढा बंद राहणार असल्याचा संदेश शेतकरी, डते, खरेदीदार व हमाल, मापारी यांना पाठविण्यात आला आहे. तूर, हळद, हरभरा, गहू आदी पिकांचे शेवटचे बीट हे १६ एप्रिल रोजी करण्यात आल्याचे सचिव पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीमशागत आटोपली आहे. जिल्ह्यातील शेतकरी पेरणीची तयारी करीत आहेत. बी-बियाणे, खते, शेतीविषयक औजारे खरेदीसाठी पैसा लागतो, हे पाहून शेतकरी शेतीमाल मोंढा येथे आणत आहेत; परंतु आता मोंढा बंदच राहणार असल्यामुळे पेरणीसाठी पैसा आणावा कोठून? असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला आहे.
हळदीची २५ हजार क्विंटल आवक
१ एप्रिलपासून हळदीची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यासह चंद्रपूर, अमरावती, जळगाव, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आदी ठिकाणांहून हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होती; परंतु कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील आदेशापर्यंत मोंढा बंद राहणार असल्याचे शेतकऱ्यांंना कळविले आहे. फाेटाे नं. ०७