शहरात वानरांच्या उड्या सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:32 AM2021-02-11T04:32:03+5:302021-02-11T04:32:03+5:30
हिंगोली : शहरात मागील महिनाभरापासून अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांची टोळी दाखल झाली आहे. ही वानरे घरांच्या छतावरुन उड्या ...
हिंगोली : शहरात मागील महिनाभरापासून अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांची टोळी दाखल झाली आहे. ही वानरे घरांच्या छतावरुन उड्या मारत आहेत. तसेच अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासधूसही करीत आहेत. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना पकडून त्यांना वनात नेवून सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त
कळमनुरी: शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
कळमुनरी: तालुक्यातील ग्रामीण परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची दखल घेऊन शहरासह परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
‘पिण्याच्या पाण्याची सोय करावी’
हिंगोली : येथील बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे बाजूच्या हॉटेलमध्ये जावून पाणी पित आहेत. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी अनेक वेळा प्रवाशांनी केली आहे. परंतु, महामंडळाने अद्यापतरी लक्ष दिलेले दिसत नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.
विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच
हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागात गेल्या काही दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच आहे. यामुळे बहुतांशवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहर वाहतूक शाखेने विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
‘नाल्यांवर औषध फवारणी करा’
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील जेतवननगर, जयभीमनगर, शिवाजीनगर, मिलन चौक आदी भागातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करुन त्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरुच
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यातील बहुतांश कर्मचारी, अधिकारी नांदेड, परभणी आदी ठिकाणावरुन ये-जा करीत आहेत. अनेकवेळा कार्यालयात उशिरा येण्याचे प्रकार घडत आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. यात नागिरकांचा वेळही जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.