अधिक मासानिमित्त औंढ्यात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:52 PM2018-05-26T23:52:48+5:302018-05-26T23:52:48+5:30
अधिकमास महिन्यात देवदर्शन, दान करण्यासाठी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्र्दी होत आहे. देशातील विविध भागातील भाविक येथे येत असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : अधिकमास महिन्यात देवदर्शन, दान करण्यासाठी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्र्दी होत आहे. देशातील विविध भागातील भाविक येथे येत असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अधिक मास लागून ११ दिवस पूर्ण झाले आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात त्यामुळे गर्दी होत आहे. या महिन्यात देवदर्शन, दान-धर्म केल्याने अधिक पुण्य प्राप्त होत असते, अशी श्रद्धा आहे. शिवाय भगवान शंकर व जावयांना याच महिन्यात मानाचे धोंडे जेवण्याचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात सुरू असतात. या महिन्यात महिलावर्ग पुण्यप्राप्ती करून घेण्यासाठी दररोज विविध प्रकारचे धोंडे अर्पण करतात. शिवाय ज्या भाविकांनी नवस केलेला असतो, त्त्यांच्याकडून गुप्तपणे सोने किंवा चांदीचे धोंडे करून देवाला वाहण्याची प्रथा आजही आहे. अनेक भाविक अशा मौल्यवान वस्तू दानपेटीत टाकत आहेत. दर्शन घेण्यासाठी मंदिरात दररोज ५ ते ६ हजार भाविक येत आहेत. यामध्ये राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, लातूर, औरंगाबाद शहरासह देशातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश येथील भाविकांची संख्या मोठी आहे. दर्शनासाठी पहाटे ५.३० पासूनच गर्दी होत आहे. दुपारी भरउन्हात देखील भाविकांची संख्या सारखीच दिसत आहे. संपूर्ण मंदिर हेमाडपंती व पाषाणाचे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात उकाडा होतो. यापासून बचाव करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा वतीने मंदिराच्या चारही बाजूला पायदान टाकले आहे.