मॉर्निग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:28 AM2021-05-22T04:28:20+5:302021-05-22T04:28:20+5:30
हिंगोली : कोरोनाचे कडक निर्बंध असतानाही सकाळच्या वेळी प्रसन्न वातावरणात फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. शरिरासाठी मॉर्निक वॉक योग्य ...
हिंगोली : कोरोनाचे कडक निर्बंध असतानाही सकाळच्या वेळी प्रसन्न वातावरणात फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. शरिरासाठी मॉर्निक वॉक योग्य असला तरी यातून कोरोना घरात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे शहरातील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना नियमावली घालून दिली आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे वारंवार आवाहनही केले जात आहे. मात्र मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील जिल्हा परिषदेसमोरील रोड, औंढा रोड, अकोला रोड, खटकाळी बायपास आदी मार्गावर पहाटेपासूनच नागरिक फिरताना दिसून येत आहेत. काही जण एकएकटे असतात, तर काही जण घोळक्याने बाहेर पडलेले दिसून येतात. यामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंतचा समावेश आहे. यातील काही जण रात्रीही शतपावली म्हणून उशिरापर्यंत फिरताना दिसत आहेत. आरोग्यासाठी फिरणे चांगले असले तरी सध्याच्या काळात घरातच मोकळ्या वातावरणात, छतावर व्यायाम करावा, मॉर्निग वॉक टाळा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
पोलिसांकडूनही सूट
कोरोनाचा कहर सुरू असताना हिंगोली शहरातील नागरिक मात्र बिनधास्त घराबाहेर पडताना दिसत आहेत. मागील महिन्यात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे थोडा आवर बसला होता. ही कारवाई थंडावल्याचे दिसताच पुन्हा नागरिकांचे घोळके बाहेर पडत आहेत. पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असली तरी ही कारवाई केवळ फार्स ठरत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाची भीती वाटत नाही का ?
कोरोनाची भीती वाटते. मात्र गुडघ्याच्या आजारामुळे सकाळच्या वेळी फिरावे लागते. घरी मोकळी जागा नसल्याने घराबाहेर थोडावेळ चालण्याचा व्यायाम करतो. यामुळे दिवसभर ताजेतवाणे वाटते. सकाळच्या वेळी फिरताना कोरोना नियमांचे पालन करीत असल्याचे एका ज्येष्ठ नारिकांनी सांगितले.
सकाळच्या सुमारास फिरल्याने दिवसभर उत्साह कायम असतो. घरात थांबून शरिराची हालचाल कमी होत आहे. यातून आजार जडण्याची भीती वाटत आहे. फिरताना कुणाच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेत असल्याचे एका नागरिकांनी सांगितले.
खुली हवा नव्हे कोरोनाचे विषाणू
हवेतून कोरोना संसर्ग पसरतो यासंदर्भात तज्ज्ञांमध्ये मतभेद असले तरी अशा स्थितीत घराबाहेर फिरणे धोकादायकच असते. त्यातही अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. घोळक्याने व्यायाम करणे, व्यायामानंतर दूध, पालेभाज्या तसेच घरी नेणे, घरी गेल्यानंतर लवकर अंघोळ न करणे, यामुळे मॉर्निग वॉकमुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसत आहे.