पत्नीसह सासूही भांडली, २ दिवस उपाशी ठेवलं; संतापलेल्या जावयाने सासूला संपवलं
By रमेश वाबळे | Published: April 18, 2023 04:39 PM2023-04-18T16:39:20+5:302023-04-18T16:39:45+5:30
दारूच्या व्यसनामुळे पत्नी आणि सासूसोबत होत असत भांडण
आखाडा बाळापूर : जावयाचे मुलीसोबत भांडण सुरू असताना सासूही घालून-पाडून बोलत असल्याने जावयाने शेळ्या बांधायचा खुंटा उपटून सासूच्या डोक्यात घातला. दारूच्या नशेत त्याने तिला ठार मारले. पत्नीलाही मारहाण करून स्वत:च्या मुलीचाही हात मुरगाळल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
आखाडा बाळापूर येथील शेवाळा रोड परिसरात राहणाऱ्या लताबाई नागराव खिल्लारे (वय ५५ वर्षे) यांच्याकडेच त्यांची मुलगी अर्चना व जावई अजय रमेश सोनवणे (वय २७) राहत होता. सासूरवाडीत वास्तव्य व आखाडा बाळापूरच्या बाजारपेठेत हमालीचे काम करून तो उपजीविका करत होता. पत्नी अर्चनासोबत राहताना दोन मुली, एक मुलगा अशा परिवारासह संसार सुरू असताना अजयला दारूचे व्यसन जडले. यावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. १६ एप्रिलला दुपारी २ वाजता तो दारू पिऊन घरी आला. जेवण वाढण्याच्या कारणावरून अर्चनाशी त्याचा वाद झाला. तेव्हा मुलीची बाजू घेत लताबाई खिल्लारे यांनी अजयला घालून पाडून बोलत राग व्यक्त केला. मात्र अजयही संतापला. शेळीला बांधण्यासाठी लावलेला खुटा उपटून त्याने सासूच्या डोक्यात घातला. बायकोलाही मारले. मुलीचाही हात मुरगाळला. सासू रक्तबंबाळ अवस्थेत पडली. शेजारच्यांनी तिला बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार गंभीर होता, असे उपस्थितांनी सांगितले. प्रथमोपचार करून नांदेडला पाठविले. परंतु त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मावळली.
जावयाला केली अटक
घटनेची माहिती होताच ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे आदी घटनास्थळी पोहोचले. जावई पळून गेल्याचे कळताच तीन पथके स्थापन केली. जावयाला कुर्तडी पाटीजवळ ताब्यात घेतले.
दोन दिवसांपासून जेवायला दिले नाही
अजय याला पोलिसांनी सासूला मारण्याचे कारण विचारले असता दोन दिवसांपासून मला जेवण दिले नाही आणि काहीबाही बोलत होती. त्यामुळे रागाच्या भरात मी तिला मारले अशी कबुलीही त्याने दिली असल्याची माहिती बोधनापोड यांनी दिली.