कान्हेगावात सुने विरूद्ध सासू....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:52+5:302021-01-10T04:22:52+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सासू- सुनेचा उभा दावा कुटुंब रंगलंय ग्रा. पं. निवडणुकीत..... रमेश कदम आखाडा बाळापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रंगतदार ...

Mother-in-law against gold in Kanhegaon .... | कान्हेगावात सुने विरूद्ध सासू....

कान्हेगावात सुने विरूद्ध सासू....

Next

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सासू- सुनेचा उभा दावा

कुटुंब रंगलंय ग्रा. पं. निवडणुकीत.....

रमेश कदम

आखाडा बाळापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रंगतदार वातावरणात कान्हेगावातील लढतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कान्हेगावात चक्क सुने विरूद्ध सासू असा रंगतदार सामना पहावयास मिळत असून सासू सुनेत कोण वरचढ ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

परभणी जिल्ह्याला पहिले खासदार देणारे कान्हेगाव जिल्ह्यात सर्वपरिचित आहे. एकाच गावातून दोन खासदार देणारे गाव अशीही या गावाची ओळख आहे. कळमनुरी तालुक्यातील कान्हेगावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ११४० एवढी मतदारसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत ७ ग्रामपंचायत सदस्य निवडायचे आहेत. त्यापैकी अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रभाग क्रमांक ३ मधील विनोद पांडुरंग मारकळ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीच्या या आखाड्यात दत्ता माने यांचे बजरंगबली ग्रामविकास पॅनल तर श्रीकांत वाघमारे यांचे जनता विकास पॅनल समोरासमोर लढत देत आहेत. सहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. तीन वॉर्डांमध्ये निवडणूक रंगली आहे. वाॅर्ड क्रमांक १ मध्ये ओबीसी महिला या प्रवर्गातून तर चक्क सासू विरूद्ध सून अशी लढत रंगली आहे. जिजाबाई मखरू गिरी या सासूबाईंविरुद्ध सिंधुताई अनिल गिरी या सूनबाईचे आव्हान उभे केले आहे. सासू- सुनेची ही लढाई मोठी गमतीदार वळणावर आली असून सासू वरचढ ठरते की सून याची रंगतदार चर्चा सर्वत्र रंगली आहे. संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष याकडे लागले आहे. याच प्रभागात सासू-सुनेच्या वॉर्डांमध्येच मुलगा अनिल मखरू गिरी यानेही ओबीसी पुरुष या गटातून दंड थोपटले आहेत. त्यामुळे एकाच प्रभागात एकाच कुटुंबातील तिघे जण उमेदवार आहेत. यात गंमत म्हणजे, सासू विरूद्ध सून असा सामना रंगला आहे. आता सासू-सुनेला मात देते की सून सासूला धूळ चारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट...

सरपंचपद मिळविण्यासाठी सासू- सुनेत संघर्ष ...

कळमनुरी तालुक्यातील कान्हेगावाचे सरपंचपद आरक्षण सोडतीत ओबीसी महिलेस सोडण्यात आले होते. त्यामुळे ओबीसी गटातील महिला सरपंच पदासाठी हवी असल्याने चक्क सासू- सुनेतच संघर्ष सुरू झाला आहे. शासनाने सोडलेले आरक्षण रद्दबातल ठरवल्याने काहीसा हिरमोड झाला असला तरीही पुन्हा जुनेच आरक्षण येईल, यासाठी दोन्ही पॅनलकडून एकाच कुटुंबातील सदस्यांना सासू-सुनेला समोरासमोर उभे केले आहे. सासू-सुनेने सरपंचपदासाठी मांडलेला उभा दावा ग्रामपंचायत निवडणुकीतील रंगत वाढवत आहे.

चौकट...

त्याच प्रभागात मुलगाही रिंगणात...

वाॅर्ड क्रमांक १ मध्ये ओबीसी महिला गटातून सासू - सून समोरासमोर उभ्या टाकल्या असताना ओबीसी पुरुष गटातून मुलगाही निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघे जण निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. सहा सदस्यांच्या निवडीसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत. हा चर्चेचा विषय बनला आहे. कुटुंब रंगलंय ग्रामपंचायत निवडणुकीत, असाही सुर परिसरातून उमटत आहे.

Web Title: Mother-in-law against gold in Kanhegaon ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.