लेकीच्या हुशारीला आईच्या कष्टाची जोड; झेडपी शाळेची विद्यार्थिनी झाली MPSC तून अधिकारी
By यशवंत भीमराव परांडकर | Published: November 25, 2022 04:22 PM2022-11-25T16:22:10+5:302022-11-25T16:22:53+5:30
विद्या कांदेने एसटीआय परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमध्ये मिळविला सहावा क्रमांक
साखरा (जि. हिंगोली): सेनगाव तालुक्यातील साखरा येथील विद्या अंकुश कांदे हिने ‘एसटीआय’ (राज्य कर निरीक्षक) परीक्षेमधून महाराष्ट्रातून मुलींमध्ये सहावा क्रमांक पटकाविला. ही परीक्षा जुलै २०२२ मध्ये घेण्यात आली होती. बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्याच्या हुशारीला आईच्या कष्टाची जोड मिळाली. अभ्यासात सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर विद्याने मिळवलेल्या यशाने तिचे कौतुक होत आहे.
साखरा येथील एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या विद्याने एसटीआय परीक्षेची चार वर्षापासून तयारी सुरू केली होती. विद्या कांदेने दहावीपर्यंतचे शिक्षण साखरा जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. दहावीमध्ये तिने ९२ टक्के गुण मिळविले. २३ नोव्हेंबर रोजी एसटीआय परीक्षेचा निकाल लागला असून विद्या कांदे हिने या परीक्षेत ४०० पैकी २७७.५ गुण मिळविले आहेत. महाराष्ट्रातून मुलींमध्ये सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल विद्याचे गुरुजन व गावकऱ्यांनी कौतुक केले.
सातवीमध्ये असताना वडिलांचा मृत्यू
राज्य कर निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्या कांदे म्हणाली, मी सातवीमध्ये होते त्यावेळेस म्हणजे २०१० मध्ये वडील वारले. यावेळी पुढील शिक्षण होईल की नाही, अशी परिस्थिती होती. आईनेच आमचा संपूर्ण सांभाळ केला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईने शेतात राबून पैसा पुरविला. परिस्थिीती तशी नाजुकच होती. माझ्या व लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी मोठ्या भावावरच होती. मोठ्या भावाचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. परंतु, लहान भावाने हालअपेष्टा सहन करत पदवीपर्यत शिक्षण पूर्ण केले आहे.
झेडपी शाळेत शिकून दहावीत ९२ टक्के
साखरा येथील जि. प. शाळेत दहावीपर्यत शिक्षण घेतले. दहावीत ९२ टक्के गुण मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुठे जावे? हा मोठा प्रश्न आईपुढे होता. परंतु माझ्या शिक्षणाची काळजी देवालाच होती, असे म्हणावे लागेल. पुढील बारावीपर्यतचे (अकरावी-बारावी) शिक्षण नवोदय विद्यालय परभणी येथे पूर्ण केले. शिक्षणाचे ध्येय गाठून आई-वडीलांचे नाव मोठे करायचे हाच उद्देश होता. लहान पणापासून मला शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेची तयारी करणे सुरु केले.
अपयश आले पण हार मानली नाही
दरम्यान, एमपीएससी मी दोन परीक्षा दिल्या. परंतु त्यात यश काही आले नाही. परंतु, नाराज न होता पुढे यश पदरात पडेल आणि आई-वडिलांचे नाव मोठे करता येईल म्हणून रात्रंदिवस अभ्यास केला. अखेर यश पदरात पडले. या यशाबद्दल माझ्या आई, दोन भावांना आणि गावकऱ्यांनाही आनंद झाला आहे.
मला विश्वास होता; यश पदरात पडणार....
बीएसाठी रिसोड येथील मुक्त विद्यापीठात प्रवेश केला. ‘बीए’ ला मला ५५ टक्के गुण मिळाले. राज्य कर निरीक्षक परीक्षा अभ्यास करुन दिली होती. त्यामुळे या परीक्षेत मी हमखास उत्तीर्ण होणार आहे हे मला माहित होते. या यशाबद्दल माझा सर्वत्र सत्कार होत आहे. माझे वडील आज असते तर त्यांना तर मोठा आनंद झाला असता. मी परीक्षा पास झाल्याचे कळताच आईने मला पेढा भरुन आशिर्वाद दिला.