कोतवाल संघटनेतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:16 AM2018-12-19T00:16:48+5:302018-12-19T00:16:52+5:30
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले.
मागील महिनाभरापासून कोतवाल संघटनेतर्फे कामबंद आंदोलन चालू आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालायासमोरही धरणे आंदोलन सुरू आहे. परंतु आजपर्यंत शासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. कोतवालांना शासनाकडून दिले जाणारे मानधन तुटपुंजी असून या मानधनाच्या आधारे संसाराचा गाडा हाकणे कठीण आहे. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कोतवाल कामे करीत आहे. परंतु या कामांचा योग्य मोबदला शासनाकडून मिळत नाही. केवळ पाच हजार दहा रुपयांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीन झाले आहे. शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, परंतु ठोस निर्णय मात्र घेतला जात नाही. तसेच आंदोलनाची दखलही शासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे संघटनेतर्फे आंदोलन केले जात आहे. तसेच जी मागणी निजामकालीन आहे, त्याविषयी जोपर्यंत कॅबिनेटमध्ये कोतवालांना चतुर्थश्रेणीचा निर्णय लागू होत नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहिल. असा निर्णय कोतवाल संघटनेने घेतला आहे. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत शासनाने कुठलाही निर्णय न दिल्यास मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण करण्यात येणार आहे. कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, सेवानिवृत्त सेवकांना पेन्शन, प्रवास भत्ता यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कोतवाल सहभागी झाले आहेत. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नायब तहसीलदार बोथीकर आदींनी आंदोलकांची भेट घेतली. प्रशासनास दिलेल्या निवेदनावर संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष बाळू नागरे, विजय चांदणे यांच्यासह कोतवालांच्या सह्या आहेत.