बाजार समितीच्या शेडसाठी खासदारांचा थेट मुख्यमंत्र्यांना कॉल
By विजय पाटील | Published: July 13, 2023 09:00 PM2023-07-13T21:00:17+5:302023-07-13T21:00:36+5:30
मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी आदेशित केले.
विजय पाटील,हिंगोली : येथील बाजार समितीत मागील अनेक दिवसांपासून शेड अपुरे पडत असल्याने शेतकऱ्यांचा माल बाहेर भिजत आहे. खासदार हेमंत पाटील यांनी येथे भेट देऊन शेतकऱ्यांसाठी पाच शेड उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच कॉल केला. मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी आदेशित केले.
हिंगोली येथील मोंढ्यात जिल्ह्यासह परजिल्ह्यातून हळद विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येते. मात्र या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या मालाच्याच थप्प्या राहत असल्याने शेतकऱ्यांचा माल बाहेरच ठेवावा लागत आहे, तर बीट करण्यासाठीही अडचणी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून मोठी नाराजी आहे. ही बाब शेतकऱ्यांनी खासदार पाटील यांच्या कानावर घातली. त्यांनी थेट हळदीच्या मोंढ्यात भेट दिली.
शेतकरी व बाजार समिती प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकले, तर शेतकऱ्यांना येथे शेड उपलब्ध करून देण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच कॉल केला. मुख्यमंत्र्यांनीही पणनच्या सचिवांना येथे शेड उपलब्ध करून देण्यास लागलीच सांगतो. तसे प्रस्ताव तयार करून सादर करा, असे सांगितले. तर खासदार पाटील यांनी येथे मुक्काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसांसाठी माझ्याकडून जेवणाची व्यवस्था करणार असल्याचेही सांगितले. शेडचा हा प्रश्न मार्गी लागल्यास येथे हळदीच्या लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय हळद करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही संख्या वाढू शकते.