मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक
By यशवंत भीमराव परांडकर | Published: July 6, 2023 05:47 PM2023-07-06T17:47:02+5:302023-07-06T17:51:28+5:30
MPSC Result: मुलगा ‘साहेब’ झाला या आनंदात शेतकरी आई-वडिलाने घरोघरी जावून पेढे वाटले.
- राजकुमार देशमुख
सेनगाव: ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल तर कोणतेही काम साध्य होते. एक दिवस आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे असे म्हणून रवींद्र चव्हाण याने अभ्यास करुन ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण करुन पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) उत्तीर्ण केली. रवींद्र ‘पीएसआय’ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे कळताच गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढत पेढे वाटण्यात आले.
सेनगाव तालुक्यातील बोरखेडी (पिनगाळे) या गावचा रवींद्र चव्हाण असून शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. रवींद्र प्रकाश चव्हाण याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत झाले. त्यानंतर आठवी ते बारावीपर्यचे शिक्षण परभणी येथील भारत भारती विद्यालयात झाले. रवींद्रच्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडीलही कमी शिकलेले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा वारसा तसा घरात म्हणावा तेवढा नाही. परंतु मोठे व्हायचे म्हणून रवींद्र चव्हाण याने शिक्षणाला अधिक महत्व दिले. २०१८ पासून तो पूणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. यामुळे रवींद्रचे ‘पीएसआय’ होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. या परीक्षेत त्यास ३९१ गुण मिळाले आहेत.
आई-वडिलांच्या डोळ्यांत आले पाणी...
प्रकाश चव्हाण यांना सात एकर जमीन असून दोन भाऊ आणि दोन मुले आहेत. यापैकी एकाने ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळविले असून दुसरा मुलगाही पोलिस भरतीची तयारी करु लागला आहे. मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाल्याची बातमी कळताच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कष्टाचे चिज झाले आहे, असे म्हणत आई-वडिलांनी देवाचे आभार मानले. गावकऱ्यांनी रवींद्र व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार केला. तसेच गावात डिजेे लावून मिरवणूक काढली.
शेतकऱ्याचा मुलगा ‘साहेब’ झाला...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक-२०२० परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. ही बातमी बोरखडी (पिनगाळे) गावात पोहोचताच मित्र परिवार, गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. शेतकऱ्याचा मुलगा ‘साहेब’ झाला या आनंदात आई-वडिलाने घरोघरी जावून पेढे वाटले.