MPSCResult: कष्टाच्या बळावर सागरचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण, आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे
By यशवंत भीमराव परांडकर | Published: July 7, 2023 06:40 PM2023-07-07T18:40:59+5:302023-07-07T18:41:29+5:30
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागरने नांदेडला राहूनच अभ्यास केला.
- सतीश घनमोडे
पुसेगाव (जि. हिंगोली): जिद्द, मेहनत, शिक्षण या बळावर मी पुढे चालून मोठा माणूस होऊन दाखविन, हे स्वप्न सागरने उराशी बाळगले होते. रात्रंदिवस अभ्यास करून सागरने पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार करून आई- वडिलांचीही इच्छा पूर्ण केली. मुलगा पीएसआय झाल्याचे पाहून आई- वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील सागर शंकरराव कापसे याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. सागरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पुसेगाव येथे झाले. आठवी ते दहावीचे शिक्षण श्री संगमेश्वर ज्ञानमंदिर जयपूर, बारावीचे भारत माध्यमिक शाळा रिसोड तर पदवीधरचे शिक्षण इंद्रा कॉलेज ऑफ फार्मसी विष्णूपुरी नांदेड येथून झाले.
पदवीला असतानाच त्यांनी ठरवले होते की, आपल्याला मोठा अधिकारी व्हायचे आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागरने नांदेडला राहूनच अभ्यास केला. गत पाच वर्षांपासून सागर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अगदी थोड्या गुणांनी त्याची निवड राहिली. मात्र, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ‘एमपीएससी’ परीक्षेत त्याने ४६ वा रँक मिळविला. त्यामुळे त्याची ‘पीएसआय’ साठी निवड झाली. सागरचे वडील हे शिक्षक असून आई गृहिणी आहे. ध्येय व जिद्दीला खंबीरपणे पाठबळ देणारे आई- वडील आहेत. त्यामुळे मी यश पदरात पाडू शकलो, असे सागरने सांगितले.
आई- वडिलांच्या प्रेमामुळे सर्वकाही...
महागाईने कळस गाठला आहे. बाहेर शिक्षण घेणे म्हणजे आज फार कठीण आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. अशा परिस्थितीत मी ‘एमपीएससी’ परीक्षा दिली. आई-वडिलांनी शेतात काम केले. तसेच वडील शिक्षक असल्यामुळे मला त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शनही मिळाले. सागर ‘एमपीएससी’ परीक्षा पास झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी व मित्र परिवाराने गावातून वाजत- गाजत मिरवणूक काढली. तसेच गावातील पुसेगाव अर्बन बँक, जिल्हा परिषद शाळा, बालाजी गल्ली आदी ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी नर्सी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, माजी सैनिक कौतिकराव कापसे, सरपंच कमलबाई अंभोरे, गजानन पोहकर, गजानन खंदारे, पिंटू गुजर, सतीश सोमाणी, विवेक कान्हेड, डॉ. रामदास पाटील, मुख्याध्यापक राजोद्दीन शेख, रविकुमार देशमुख आदी उपस्थित होते.