महावितरणने न.प.ची वीज तोडली; न.प.ने केले वीज कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:54+5:302021-07-24T04:18:54+5:30
महावितरणकडून आता वीज देयकांच्या वसुलीसाठी चांगलाच तगादा लावला जात आहे. हिंगोली न.प.ला एक ते दीड महिन्यांपूर्वीच पाणीपुरवठ्याची वीज तोडल्याच्या ...
महावितरणकडून आता वीज देयकांच्या वसुलीसाठी चांगलाच तगादा लावला जात आहे. हिंगोली न.प.ला एक ते दीड महिन्यांपूर्वीच पाणीपुरवठ्याची वीज तोडल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी मध्यस्थी करून देयक भरल्यानंतर वीज सुरळीत झाली होती. आता पुन्हा न.प.च्या पाणीपुरवठ्याचे देयक न भरल्याने महावितरणकडून थेट वीज जोडणी कापण्यात आली. यात न.प.कडून मात्र आम्ही देयक भरायला तयार होतो. तसा धनादेशही तयार झाला होता. मात्र, महावितरणकडून आततायीपणे वीज तोडल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना मात्र त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. सार्वजनिक सेवेला बाधा पोहोचविण्याचे काम महावितरणने केले आहे, असे न.प.चे म्हणणे आहे, तर दुसरीकडे वारंवार सांगूनही देयक भरले नव्हते. त्यासाठी बेकायदेशीररीत्या आमच्या कार्यालयास न.प.ने सील ठोकले. चालू वर्षाची ९३ हजारांची कराची देयके ६ जुलैला महावितरणला मिळाली. त्यातच १५ दिवसांत न भरल्यास नोटीस देण्यात येईल. त्यानंतर जप्ती वाॅरंट काढण्यात येईल, असे म्हटल्याचे सांगण्यात आले. मग जाणीवपूर्वक ही कारवाई करून दीड ते दोन तास आमच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
नियमित कारवाई
याबाबत न.प. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे म्हणाले, आम्ही पाणीपुरवठ्याच्या देयकाचा धनादेश दिल्याने वीज जोडणी करण्यात येईल, असे महावितरणने सांगितले आहे. काही कार्यालयांकडे थकबाकी वाढल्याने नियमितपणे सील ठोकण्याची कारवाई केली आहे. इतर कार्यालये व नागरिकांनी कर भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव म्हणाले, आमच्या कार्यालयाने मोठ्या थकबाकीसाठी वीज तोडली. नियमित देयक भरल्यास कारवाईचा प्रश्नच नाही. जे सील ठोकले तो प्रकारही गैरकायदेशीर आहे. नाहक वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.