वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणची विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:09+5:302021-05-29T04:23:09+5:30
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता एप्रिल आणि मे महिन्यात महावितरणच्या वतीने हिंगोली शहर व परिसरातील झाडेझुडपे तोडण्यात आली. अनेक ठिकाणी ...
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता एप्रिल आणि मे महिन्यात महावितरणच्या वतीने हिंगोली शहर व परिसरातील झाडेझुडपे तोडण्यात आली. अनेक ठिकाणी झाडेझुडपे वीज वाहिन्यांवर पडण्यामुळे वीजपुरवठा खंडित होत होता. ही बाब लक्षात घेऊन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता रजनी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उप कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी वीजपुरवठ्यास अडथळा होत असलेल्या जागेचा आढावा घेतला. त्यानंतर काही निवडक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दोन महिने विशेष मोहीम राबविली.
शहरातील खाकीबाबा उपकेंद्र महत्त्वाचे असून या केंद्राकरिता १३२ केव्ही उपकेंद्र हिंगोली व २२० केव्ही उपकेंद्र लिंबाळा या दोन उपकेंद्रांवरून दुहेरी वीजपुरवठा केला जात आहे. यासाठी ३३ केव्ही लाइन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू केले आहे. यासाठी निवडक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
महावितरण वीज ग्राहकांच्या दारी...
विजांचा कडकडाट, वेगाने वाहत असलेले वारे, पावसाची शक्यता असल्यास किंवा इतरवेळी वीज खंडित झाल्यास महाविरणशी संपर्क साधावा. महावितरण सदैव ग्राहकांच्या सेवेत आहे.
- दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता