मुस्लिम महिलांचा हिंगोलीत मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:27 AM2018-04-03T00:27:50+5:302018-04-03T16:35:42+5:30
आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे २ मार्च रोजी मुस्लिम महिलांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदान येथून मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे २ मार्च रोजी मुस्लिम महिलांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदान येथून मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
लोकसभेत मंजूर करण्यात आलेले तीन तलाक बंदी विधेयक मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू, धर्म पंडित वा कोणालाही विचारात न घेता संमत करण्यात आले. या विधेयकाला नाकारत सरकारने हे बिल मागे घ्यावे या मागणीसाठी हिंगोली येथे मुस्लिम सामाज बांधवांतर्फे मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सहभाग झाल्या होत्या. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. यावेळी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी कुराण पठणाने जाहीर सभेस प्रारंभ करण्याता आला. यावेळी तीन तलाक बंदी विधेयकाचा मुस्लिम महिलांनी तीव्र निषेध व्यक्त केला. तर विरोध दर्शविणारे फलकही हाती घेतले होते. मोर्चात सहभागी महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
वाहतूक सुरळीत :पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
हिंगोली शहरातील इदगाह मैदान येथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना श्री अग्रसेन महाराज चौकात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ये-जा करणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.
जिल्हा कचेरी प्रवेशद्वारसमोर सभेत मुस्लिम महिलांनी सरकारचे हे बिल महिलांच्या मूलभूत हक्कांच्या विरोधात आहे, या विषयावर मार्गदर्शन केले. तळपत्या उन्हात लहान मुलाबाळांसह महिला मोर्चात सहभागी झाल्या. पाणी व बिस्कीट वाटप करण्यात आले.
मुस्लिम समाज बांधवातर्फे काढलेल्या मूकमोर्चात शिस्तबद्धतेचे दर्शन घडले. मोर्चात महिलांची मोठी गर्दी होती. तळपत्या उन्हात मुलाबाळांसह सहभागी महिला अतिशय शिस्तीत सहभागी झाल्या.
शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन
जिल्हा कचेरीसमोर जाहीर सभेनंतर मोर्चातील शिष्टमंडळाने सरकारच्या तलाक बंदी विधयेकाच्या निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना दिले. मोर्चा यशस्वीतेसाठी सर्व मुस्लिम संघटनांनी परिश्रम घेतले. पोलीस प्रशासनाकडूनही यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सरकारचे बिल, संविधान, मूलभूत हक्काविरूद्धच
जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सभेत अनेक महिलांनी मार्गदर्शन केले. जमात ए- इस्लामीच्या अध्यक्षा शगुप्ता परवीन यावेळी म्हणाल्या, आज भारतात ज्या समस्या गंभीर आहेत, त्या सोडवायचे सोडून तीन तलाक बंदीच्या मागेच पंतप्रधान लागले आहेत. त्यामुळे भारतात हीच एक समस्या आहे की काय? असा प्रश्न पडत आहे, परंतु शरियतध्ये कुठलाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच अस्मा सालेहाती बाजी म्हणाल्या, सरकार उगीचच शरियतमध्ये ढवळा-ढवळ करीत आहे. बेरोजगारीसह इतर समस्याही समजून घेणे महत्त्वाचे आहे. उझ्मा फायेझा बाजी, कौसर बेगम तसेच जोहरा बाजी यांनीही यावेळी मत व्यक्त केले.