किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
By विजय पाटील | Published: April 24, 2024 12:11 PM2024-04-24T12:11:43+5:302024-04-24T12:11:59+5:30
आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले.
कुरूंदा (हिंगोली): किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील कानोसा येथे २३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आज सकाळी ठिय्या मांडला.
कानोसा येथे मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास रामकीशन तानाजी बेंडे (३२) याच्या पोटात चाकू भोसकला. तसेच छातीवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. यातच रामकीशनचा मृत्यू झाला. दरम्यान, आज सकाळी मृताच्या नातेवाईकांनी कुरुंदा पोलीस स्टेशन गाठत आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत ठिय्या मांडला. खूनाची घटना घडून बराच काळ लोटला तरी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची कोणतीच हालचाल न झाल्याने कानोसा येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, आरोपीच्या शोधात कुरुंदा पोलिसांनी पथक रवाना केले आहे. आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले. कुरुंदा भागातील नेहरूनगर भागातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. मयताच्या शेतातील आखाड्यावर हा प्रकार झाला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी दिली.