दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून; अखेर चार वर्षानंतर आरोपी गजाआड
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: December 26, 2023 08:10 PM2023-12-26T20:10:11+5:302023-12-26T20:11:32+5:30
नर्सी पोलिस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे यश; ४८ हजारांचे दागिने हस्तगत
हिंगोली : शेळीचे पिल्ले चारण्यासाठी शेतात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दागिण्यासाठी खून करणाऱ्या आरोपीस अखेर चार वर्षानंतर पोलिसांनी गजाआड केले. त्याचेकडून ५६ तोळे वजनाचे चांदीचे दागिणे पोलिसांनी हस्तगत केले.
सेनगाव तालुक्यातील तळणी येथील मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय ६५) या जानेवारी २०२० मध्ये शेळीचे पिल्ले चारण्यासाठी तळणी शिवारात गेल्या होत्या. यावेळी त्यांचा गळा आवळून खून करून आरोपीने त्यांच्या अंगावरील दागिणे काढून घेतले होते. या प्रकरणी नर्सी. ना. पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र आरोपीचा सुगावा लागत नव्हता. तब्बल साडेतीन वर्ष उलटले तरी गुन्हा उघड होत नव्हता. दरम्यान, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मारेकऱ्याचा शोध घेण्यासंदर्भात सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखा व नर्सी पोलिसांनी तपासाची गती वाढविली. यात मथुराबाई यांचा खून रेकॉर्डवरील गुन्हेगार नागोराव सुखदेव श्रीरामे (वय २६ रा. हानकदरी ता. सेनगाव) याने केल्याची माहिती मिळाली. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचेकडून ५६ तोळे वजनाचे ४८ हजारांचे चांदीचे दागिणे हस्तगत केले. आरोपी हा पोलिस कोठडीत आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अरूण नागरे, शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलिस अंमलदार गोविंद गुठ्ठे, पांडुरंग डवले, हेमंत दराडे, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.
खूनाच्या घटनेनंतरही ३ महिलांच्या अंगावरील दागिने घेतले काढून
दरम्यान, वृद्ध महिलेचा गळा आवळून दागिणे काढून घेतले. या घटनेनंतरही आरोपीने ३ महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरीने काढून घेतले. त्याचेवर जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.