सीएए, एनआरसी विरोधात हिंगोलीत मुस्लिम बांधवांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 05:38 PM2020-02-01T17:38:47+5:302020-02-01T17:41:55+5:30
केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी, राष्ट्रपतींना पाठविले निवेदन
हिंगोली : मुस्लिमबांधवांच्या वतीने सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याच्या विरोधात हिंगोलीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. या काळ्या कायद्यांना रद्द करून डिटेंशन सेंटरचे काम त्वरित बंद करण्याची मागणीही निवेदनात केले आहे.
राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रात २0१४ ला भाजपप्रणित सरकार आल्यापासून देशात नवनवीन कायदे आणले जात आहेत. त्यामुळे अराजकतेचे वातावरण निर्माण होत असून सामाजिक विभाजनाचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे देशात बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील घसरण, रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई, भ्रष्टाचार, उद्योगधंद्यांची झालेली वाईट परिस्थिती जनतेचे जगणे मुश्किल झाले असताना त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे कायदे आणले जात आहेत. महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. या सरकारला जनता वरील मुद्यांवरून जाब विचारण्याच्या तयारीत असतानाच सीएए, एनआरसी, एनपीआरसारख्या बाबी समोर आणल्याचा आरोपही केला आहे. दिल्लीतील शाहीनबागचे शांततापूर्ण आंदोलन अवैध ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हे जेलभरो आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले.
या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. दुपारी दीड वाजेपासून शहरातील इंदिरा गांधी चौकात समाज बांधव जमू लागले होते. जवळपास दीड तास घोषणाबाजी झाली. यात केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलीस या कार्यकर्त्यांना पकडून व्हॅनमधून नेत असताना काहीजण व्हॅनच्या टपावर चढले होते. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.