बँकेच्या फिल्ड ऑफिसरने खातेदारांच्या नावे उचलले परस्पर कर्ज; १२ लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 07:34 PM2022-01-22T19:34:13+5:302022-01-22T19:34:58+5:30
पदाचा गैरवापर करून कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता काही खातेदारांच्या नावे कर्ज मंजूर केले.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील चार खातेदारांच्या नावाने याच बँकेच्या फिल्ड ऑफिसरने तब्बल १२.५५ लाखांचे कर्ज उचलून चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साखरा शाखेतील फिल्ड ऑफिसर विकास भास्कर मोरे यांनी १ मार्च २०१९ ते २४ ऑक्टोबर २०२१ या काळात आपल्या पदाचा गैरवापर करून कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता काही खातेदारांच्या नावे कर्ज मंजूर केले. यासाठी त्यांचे सिबिल रिपोर्टही तपासले नाही. तसेच या खातेदारांनाही याची माहिती नव्हती. दोघांच्या नावाने पीककर्ज तर दोघांच्या नावाने व्यवसायासाठी कर्ज उचलले. ते त्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर इतरत्र वळती केले. त्यामुळे या खातेदारांची व बँकेची १२ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने शाखा व्यवस्थापक सुशील श्रीमंत उजगरे यांनी २१ जानेवारी रोजी विकास मोरेविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
आणखीही प्रकाराची भीती?
या भागातील अनेक खातेदारांची अशी फसवणूक तर झाली नाही? हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे अनेक खातेदार बँकेत चौकशीला येताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर करण्यास एरवी या बँकेत अनेक खेटे घालावे लागतात, मात्र परस्परच कर्ज उचलण्याचा प्रकार घडल्याने ग्राहक हादरून गेले आहेत.