'मित्रा मला वाचव', पोहताना वात आलेल्या तरुणाची आर्त हाक ऐकून मित्र मदतीला धावला पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 06:07 PM2023-05-27T18:07:49+5:302023-05-27T18:08:15+5:30
मित्राने दोन वेळेस बुडणाऱ्या तरुणाला बाहेर काढले, पण शेवटी हात सुटला अन्
आखाडा बाळापूर ( हिंगोली ): उन्हाच्या काहिलीत कळमनुरी तालुक्यातील बोथी तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोहता पोहताच अचानक 'वात' आला. त्याने तशी साथीदाराला कल्पना देत वाचविण्यासाठी आर्त हाक दिली. सोबत पोहणाऱ्या मित्रानेही त्याला वाचविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. परंतु तो खोल पाण्यात जात होता. मित्राचे प्रयत्नही निष्प्रभ ठरले. पोहता पोहताच वात आल्याने तो तरुण पाण्यात बुडाला आहे .त्याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थ व पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु अद्याप त्याचा शोध लागला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील रहिवासी दीपक किशनराव मारकळ ( 21) हा त्याचा मित्र रायाजी विठ्ठल खंदारे याच्या सोबत आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेला होता. उन्हाची प्रचंड काहिली असतांना गारवा मिळवण्यासाठी ते पोहायला गेले. दरम्यान, पोहत असताना अचानक दीपक यास वात आला. रायाजीला त्याने आवाज देऊन मला वात आला, मला वाचवा अशी आर्त हाक दिली. रायाजी याने त्याच्याकडे धाव घेत वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला दोन वेळा पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला यश झाले नाही. अखेर हातून निसटल्याने दीपक बुडाला.
दरम्यान, ही खबर रायाजीने बाहेर येत ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ तलावाकडे धाव घेत दीपकचा शोध घेतला. परंतु तो काही सापडला नाही. ही घटना बाळापूरचे पोलीस ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांना कळताच पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, कर्मचारी हिवरे , वानोळे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न शर्थीने केला. परंतु त्याचा शोध अद्याप लागला नाही. कळमनुरी येथून गोताखोर घेऊन डॉ. सतीश पाचपुते मदतीला धावले आहेत. परंतु अद्याप तरुणाचा शोध लागला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. उन्हाच्या काहिलीने त्रस्त असल्याने भर उन्हात पोहण्याचा आनंद घेताना तरुण बुडाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.