हातापायाला सुटला कंप, देवा ! कधी मिटेल हा संप; संपामुळे रुग्णसेवा कोलमडली
By यशवंत भीमराव परांडकर | Published: March 16, 2023 03:05 PM2023-03-16T15:05:32+5:302023-03-16T15:05:55+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस; कर्मचारी मागणीवर ठाम
हिंगोली: जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर मागण्यांसाठी सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कामकाजावरही परिणाम झाला आहे. जिल्हा रुग्णालयात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना तर कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे तिष्ठत बसण्याची वेळ आली आहे.
रोज सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेदरम्यान कान-नाक-घसा, नेत्र, अपघात, स्कॅन अशा जवळपास २० ते २२ ओपीडी उघडतात. परंतु तीन दिवसांपासून संप सुरु असल्यामुळे ओपीडी उघडायला उशीर होऊ लागला आहे. ओपीडी उघडल्यानंतर डॉक्टर वेळेवर येतीलच असे नाही. वैद्यकीय अधिकारी संपावर नसले तरी ते पाच-ते दहा मिनीटांनी उशिरा येऊ लागले आहेत, असे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांनी सांगितले. साडेनऊ वाजता ओपीडी उघडत असली तरी सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनीटे हजेरीसंदर्भात स्वाक्षरीतच जात आहेत. वर्ग ३ चे ६१ व वर्ग ४ चे २३ असे एकूण ८४ कर्मचारी संपावर गेल्यामुळे रुग्णांना डॉक्टर येईपर्यत रुग्णांना ओपीडीजवळ बसून रहावे लागत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप तीन दिवसांपासून सुरु झाला असला तरी आरोग्यसेवेत कोणतीच कमी पडत नाही. सर्वच वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांची तपासणी करुन उपचार करत आहेत, असे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.
देवा ! कधी मिटेल हा संप...
मागच्या पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी उन जास्त पडत आहे तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. बदललेल्या वातावरणामुळे डोके दुखणे, चक्कर येणे, ताप येणे, मळमळ होणे, हातापायाला कंप सुटणे आदी प्रकाराला सामोरे जावे लागत असून तशा प्रकारचे रुग्णही दवाखान्यात येत आहेत. १६ मार्च रोजी हिंगोली तालुक्यातील खानापूर (चिता) सदाशिव व्हडगीर जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांना हातापायाला मुंग्या येत होत्या. दुसरे म्हणजे त्यांचे डोकेही जड पडू लागले होते. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकाला विचारले असता ते म्हणाले, सध्या सदाशिवला ताप येत असून हातापायाला मुंग्या येत आहेत. एक नातेवाईक ओपीडीत जाण्यासाठीची चिठ्ठी काढायला गेले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे चिठ्ठी काढायला उशिर होत आहे त्यासाठी ते व्हरांड्यात बसले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप करु नये, एवढेच आम्हाला म्हणायचे आहे.