"माय काऊन फाशी घेतली गं"; आमदार बांगरांवर पलटवार, करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 07:00 PM2024-01-11T19:00:14+5:302024-01-11T19:01:48+5:30

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे

"My wife was hanged"; Counter attack on MLA Santosh Bangar, reminded by ayodhya paul | "माय काऊन फाशी घेतली गं"; आमदार बांगरांवर पलटवार, करुन दिली आठवण

"माय काऊन फाशी घेतली गं"; आमदार बांगरांवर पलटवार, करुन दिली आठवण

हिंगोली - शिवसेनेतील फुटीनंतर बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन करणारे, डोळ्यातून अश्रू ढाळत आपली शिवसेना भक्ती सांगणारे आमदार संतोष बांगर शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेले. त्यानंतर, शिंदेंच्या गटाचं उदो उदो करत त्यांनी ठाकरे गटावर अनेकदा हल्लाबोल केला. याच वादातून शिवसेनेच्या महिला सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार संतोष बांगर यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे, बांगर यांच्या विधानानंतर पौळ आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात.  

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे. त्यातच या निकालावर भाष्य करताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी भलतेच विधान केले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईन, असं धक्कादायक विधान बांगर यांनी केले. बांगर यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, काहींनी त्यांचं हे विधान नौटंकी असल्याचं म्हटलं. कारण, यापूर्वीही त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी मिशी कापण्याचं चॅलेंज दिलं होतं. पण ते पूर्ण केलं नाही. आता, त्यावरुनच शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांनी बांगर यांना पुन्हा डिवचलं आहे.  

दादुड्या, तू फक्त चॅलेंजच करतो, आधी मिशीचं चॅलेंज केलं होतं, ते कुठे पूर्ण केलं. मात्र, आताचं चॅलेंज नक्की पूर्ण कर बरं, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी मृताच्या नातेवाईकांप्रमाणे रडण्याची नक्कल करुन, माझा कंस भाऊ गेला गं, माय काऊन फाशी घेतली गं... असं रडण्याचं नाटक करत रडगाणंही गायलं.

हिंगोली जिल्ह्यातील शिवसेने पदाधिकाऱ्यांना पौळ यांनी आवाहनही केलं आहे.. भरचौकात फाशीसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य आणून ठेवायचं आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पतंप्रधान होणार नाहीत, तर माझा दादुड्या म्हणजे आमदार संतोष बांगर साधा सरपंचही होणार नाही. इथला आमदार, खासदार हे सगळेच पडणार आहेत. आपल्या सगळ्यांचा भगवा झेंडा इथं फडकणार आहे. त्यामुळे, आता सर्वांनी टीमवर्क करायचं आहे, असे म्हणत अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांच्या आव्हानाची खिल्ली उडवली. तसेच, बांगर यांनी हे चॅलेंज नक्की पूर्ण करावं, त्यांच्याकडे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, खाऊन-पिऊन काळजी घ्यावी, असेही पौळ यांनी म्हटले. 

काय म्हणाले आमदार बांगर

सर्वसामान्यांच्या घरात लोकांना माहिती आहे आपल्याला शिवेसना-भाजपालाच निवडून द्यायचे आहे. मी निकाल आमच्याच बाजूने लागणार हे सांगितले होते. २०२४ ला ठामपणे छाती ठोकून सांगतो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येणार आहेत. जर मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईन. या देशात मोदीच पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं.
 

Web Title: "My wife was hanged"; Counter attack on MLA Santosh Bangar, reminded by ayodhya paul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.