म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही; जिल्ह्यात १५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:50+5:302021-05-28T04:22:50+5:30
म्युकरमायकोसिस हा दुर्मीळ आजार आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर आक्रमण करीत आहे. यात मधुमेह, स्टेरॉईडचा ...
म्युकरमायकोसिस हा दुर्मीळ आजार आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर आक्रमण करीत आहे. यात मधुमेह, स्टेरॉईडचा मारा, ऑक्सिजन जास्त काळ लागणे या प्रकारामुळे कोरोना रुग्णांत म्युकरमायकोसिस दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत १५ रुग्ण आले आहेत. मात्र, खासगीमध्ये उपचार घेणारेही याच्या तीनपट असण्याची शक्यता आहे. फंगस स्टेन चाचणी येथे होत नसल्याने अनेकजण थेट नांदेड किंवा औरंगाबादचा रस्ता धरत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नंतर नोंदी होत नाहीत. कोरोनासारखा हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी या आजाराला घाबरण्याचे तेवढे कारण नाही. फक्त रुग्ण हाताळताना किंवा रुग्णांनीही इतर वस्तू हाताळताना ग्लोव्हजचा वापर केल्यास अधिक चांगले. त्यामुळे नातेवाइकांनी वेळीच रुग्णावर उपचार होतील, याची काळजी मात्र घेणे गरजेचे आहे.
औषधींचा पुरेसा साठा कधी मिळणार?
हिंगोली जिल्ह्यात म्युकरमायकोसिसवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार अजून कुणी करीत नाही. कारण बाजारपेठेत त्यासाठीची आवश्यक औषधी नाही. जिल्हा रुग्णालयातही ॲम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचे ४० व्हायल होते. आता २३० नवीन आले. एका रुग्णाला २० ते ४० इंजेक्शन लागतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात औषधी कधी येणार? हा प्रश्न आहे.
ही घ्या काळजी
मधुमेह असलेल्यांनी कोरोनानंतर तीन ते पाच आठवड्यांनी एकदा म्युकरमायकोसिसच्या धर्तीवर तपासणी करून घ्यावी, तर मधुमेह नसलेल्यांनी बिटाडिन गार्गलने गुळण्या कराव्यात. तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी करावी.
म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकोसिसच्या प्राथमिक लक्षणांत डोळ्याखाली सूज येणे, टाळूमध्ये सूज येणे, जबड्यांत पू भरणे अथवा प्रचंड वेदना होणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. याशिवाय शिंकल्यावर नाकातून काळा मल तसेच काळे बेडके पडणे ही लक्षणेही दिसू शकतात.
डॉक्टर काय म्हणतात ?
म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. वेळेत उपचार घेतल्यास त्यापासून धोकाही नाही. दात, जबडे, डोळ्याखाली सूज दिसताच तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
-डॉ. फैसल खान, मुख शल्यचिकित्सक
म्युकरमायकोसिसबाबत आता बऱ्यापैकी जागरुकता आली. हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र, कोरोनानंतर डोळ्यांची जराही समस्या झाली तरीही रुग्ण दाखवायला येत आहेत. मात्र, कुणी बाधित आढळला नाही.
-डॉ. किशन लखमावार, नेत्रतज्ज्ञ
म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे दिसणारे रुग्ण आढळत आहेत. हा संसर्गजन्य आजार नाही. घाबरून न जाता वेळेत उपचार करून घेतले पाहिजेत.
-डॉ. यशवंत पवार, फिजिशियन
जिल्ह्यातील म्युकरमायकोसिचे रुग्ण १५
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील मृत्यू ०१
जिल्हा रुग्णालयात आता नव्याने १० कोरोनाचे बेड तयार केले आहेत. या ठिकाणी रुग्णांसाठी सर्व सुविधांयुक्त व्यवस्था केली जाणार आहे.