वसमत येथील खुनाचे गूढ कायम; मयताची ओळखही पटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:43 PM2019-09-24T23:43:52+5:302019-09-24T23:44:18+5:30
येथे सोमवारी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या खुनाचे गुढही कायम आहे. पोलीस मयताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथे सोमवारी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या खुनाचे गुढही कायम आहे. पोलीस मयताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.
वसमत येथील महिला रुग्णालयाच्या पाठीमागे सोमवारी ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्तदेह सापडला होता. सदर इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. अनोळखी इसमाचा निर्घृण खून वसमत येथे झाल्याने खळबळ उडाली आहे.
मयत इसमाची ओळख पटवण्यासाठी कोणतीही कागदपत्रे मृतदेहाजवळ सापडलेली नाहीत. त्यामुळे हा मयत कोण, खून कोणी केला. खुनामागचे कारण काय, या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांवर आले आहे. खुनाचा छडा लावण्यासाठी मयताची ओळख पटणे क्रमपाप्त आहे. त्यासाठी वसमत पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले आहे. वाड्या- वस्त्यांवर पोलीस पथक पाठवून मयत इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मयत इसमाची ओळख पटविणे सुरू असून या खुन प्रकरणाचा छडा निश्चित लागेल, असे वसमत ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सांगितले.