बनावट नोटांप्रमाणे आरोपीचे नावही बनावट
By admin | Published: May 30, 2017 10:09 PM2017-05-30T22:09:43+5:302017-05-30T22:09:43+5:30
लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटांच्या बदल्यात ख-या नोटा पळविणा-या महाठगांनी खोटी नावे सांगून चक्क पोलिसांनाच मामा बनविले असल्याचे पोलिस तपासात उघड होत
Next
>ऑनलाइन लोकमत
औंढा नागनाथ, दि.30 - लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटांच्या बदल्यात ख-या नोटा पळविणा-या महाठगांनी खोटी नावे सांगून चक्क पोलिसांनाच मामा बनविले असल्याचे पोलिस तपासात उघड होत आहे. या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालल्याने न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निलंबित पोलिस कर्मचारी गजानन निर्मले यांच्या मदतीने १० लाख रुपयांच्या बदल्यात ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देतो म्हणणारी आंतरराज्यीय महाठगांची टोळीचा औंढ्यात पकडून त्यांचा पर्दाफाश केला होता. यामध्ये श्रीनिवास हनमंडलू भोमपल्ली, सौफ खान जान खान, अनवर खान गफूरखान या तीन आरोपींना रंगेहाथ पकडले होते. यातील मुख्य सूत्रधार नसरूल्ला पठाण, देवकर, निजामाबाद येथील राजू उर्फ धर्मराज हे फरार झाले होते. यातील राजू उर्फ धर्मराज याचा पोलिसांनी शोध घेतला असता त्याचे खरे नाव उर्फ अँडरसन अँथोनी जपानी (रा.अर्थनगर, निजामाबाद) असे आढळून आले. शिवाय त्याने राहण्याचा पत्तादेखील खोटा दिला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तीन राज्यात ही टोळी लोकांना फसविण्याचे काम करीत असल्याचे तपासात उघड होत असल्याने गुंता वाढत चालला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आरोपींना आणखी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील अॅड. चेतन अग्रवाल यांच्यामार्फत न्यायालयाकडे केली होती. न्यायाधीश जी.जी. चोंढे यांनी ती मान्य करीत आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली.