रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टर नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:55 AM2021-02-18T04:55:42+5:302021-02-18T04:55:42+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची तब्बल १२ पदे रिक्त असल्याने रिक्त पदांमुळे ...
हिंगोली : जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची तब्बल १२ पदे रिक्त असल्याने रिक्त पदांमुळे इतर डॉक्टरांवर ताण येत आहे. तसेच रुग्णांनाही पुरेशी सुविधा मिळत नसल्याची ओरड रुग्णांमधून होत आहे.
जिल्ह्यात हिंगोली येथे जिल्हा रुग्णालय, वसमत, औंढा, सेनगाव येथे उपजिल्हा रुग्णालयातून एकमेव स्त्री रुग्णालय वसमत येथे कार्यान्वित आहे. शिवाय आखाडा बाळापूर येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. वर्ग १ व वर्ग २ चे मिळून जिल्ह्यात १०२ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र यातील ८९ पदे भरलेली आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १ ची १२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना स्पेशालिस्ट डॉक्टरांची सेवा मिळणे अवघड बनले आहे. त्या तुलनेत उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने केला आहे. मात्र जिल्हा रुग्णालयातील तब्बल आठ पदे रिक्त असल्याने स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या उपचाराला मुकावे लागत आहे.
बॉक्सआयसीयू स्पेशालिस्ट डॉक्टरांची मिळते सेवा
हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात आयसीयू कक्ष असून, यामध्ये अतिगंभीर रुग्ण दाखल होतात. इतर जिल्ह्यात आयसीयू स्पेशालिस्ट डॉक्टरांची पदे भरली नसल्याची ओरड होत आहे. हिंगोलीत मात्र ही पदे भरलेली असून, या कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना सेवा मिळत आहे.
प्रतिक्रिया
हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात आयसीयू कक्ष असून, यामध्ये डॉक्टरांची पदे भरलेली आहेत. अति दक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक