छातीवर खंजीर ठेवत नांदेडच्या व्यापा-यास लाखोला लुटले, सेनगाव- हिंगोली मार्गावर रात्रीचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:04 PM2017-10-23T13:04:01+5:302017-10-23T13:10:55+5:30
ऑईल व ग्रीसची विक्री करून सेनगाववरून नांदेडला परतणा-या व्यापा-याला हिंगोली जवळ खंजीराचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपयाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.
हिंगोली : ऑईल व ग्रीसची विक्री करून सेनगाववरून नांदेडला परतणा-या व्यापा-याला हिंगोली जवळ खंजीराचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपयाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ओमप्रकाश सोमाणी असे व्यापा-याचे नाव असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नांदेड येथील ओमप्रकाश सोमाणी हे ऑईल व ग्रीसचा व्यापार करतात. रविवारी ( दि. २२ ) ते व्यापारानिमीत्त सेनगाव येथे पिकअप गाडीसह सेनगाव येथे आले होते. येथे ऑईल व ग्रीसची विक्री केल्यानंतर संध्याकाळी सोमाणी त्यांच्या दोन साथीदारांसह नांदेडला परतत होते. प्रवासादरम्यान आठ वाजेच्या सुमारास सेनगाव- हिंगोली मार्गावर खुडूज पाटीजवळ त्यांची गाडी अज्ञात बाईकस्वारांनी अडवली. यानंतर बाईकस्वारांनी खाली उतरत सोमाणीसह त्यांच्या साथीदारांना खंजीराचा धाक दाखवत त्यांच्याकडे पैशाच्या मागणी केली.
यावेळी यातील एकाने सोमाणी यांच्या छातीला खंजीर लावत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांच्याकडील रोख १ लाख १७ हजार रुपये लुटले. यासोबतच तिघांचे मोबाईल व पिकअप वाहनाची चावी चोरट्यांनी सोबत नेली. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस. सोनवणे हे करत आहेत.