नर्सी येथे १३ सदस्य निवडीसाठी ३२ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:40+5:302021-01-09T04:24:40+5:30
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव ग्रामपंचायत मोठी व राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ग्रामपंचायत असून याठिकाणी एकूण पाच ५ प्रभागांतील ...
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव ग्रामपंचायत मोठी व राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ग्रामपंचायत असून याठिकाणी एकूण पाच ५ प्रभागांतील १३ सदस्य निवडीसाठी दोन पॅनलकडून २६ तर अपक्ष ६ असे एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
नर्सीसह, केसापूर, कडती, गीलोरी, सरकळी, उमरा, आमला याठिकाणीसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. नर्सीसह बहुतांश ठिकाणी दोन पॅनलमध्ये लढत होत असून केवळ आमला ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे.
नर्सी सर्कलमधील मोठ्या ग्रामपंचायतमध्ये पाच प्रभागांमधून १३ उमेदवार निवडून येणार असून काही प्रभागांमध्ये दोन पॅनेलमध्ये तर काही प्रभागात अपक्ष उमेदवार निवडणूक लढत आहेत. प्रभाग १ मध्ये ३ जागेसाठी दोन पॅनल व दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत आहे. प्रभाग २ मध्ये दोन जागांसाठी दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. प्रभाग ३ मध्ये दोन पॅनलमध्ये व एक अपक्ष उमेदवारामध्ये लढत आहे. प्रभाग ४ मध्ये तीन जागांसाठी दोन पॅनल व दोन अपक्ष उमेदवारामध्ये लढत असून या प्रभागांमध्ये काही उमेदवार हे दुसऱ्या प्रभागातील उभे टाकल्याने या उमेदवारांना निवडून येण्यासाठी येथे मोठी कसरत करावी लागणार आहे. प्रभाग ५ हा नर्सी - हळदवाडी संयुक्त असून याठिकाणी तीन जागांसाठी दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. येथे एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. इतर प्रभागांतील उमेदवार या प्रभागामध्ये उभे राहिल्याने याठिकाणीसुद्धा अतिशय अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सर्व प्रभागातील मतदार हे कोणाला प्रथम पसंती क्रमांक देऊन विजयी करतात हे १८ जानेवारीला चित्र स्पष्ट होणार आहे. नर्सी सर्कल मधील केवळ आमला ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश आले आहे.