नवरात्रोत्सवाची हिंगोलीत धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:12 AM2018-10-14T00:12:53+5:302018-10-14T00:13:18+5:30
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रदर्शनीत गर्दी वाढत असून धुळीचा त्रास मात्र वाढत चालल्याचे चित्र आहे. शिवाय शहरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध ठिकाणी देवीचे मंडप अतिशय सुरेख मंडप उभारण्यात आले आहेत. कुणी जहाजाची प्रतिकृती तर कुणी किल्ला, मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रदर्शनीत गर्दी वाढत असून धुळीचा त्रास मात्र वाढत चालल्याचे चित्र आहे. शिवाय शहरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध ठिकाणी देवीचे मंडप अतिशय सुरेख मंडप उभारण्यात आले आहेत. कुणी जहाजाची प्रतिकृती तर कुणी किल्ला, मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
हिंगोली येथे दरवर्षी ऐतिहासिक दसरा महोत्सवाबाबत येथीलच नव्हे, तर परजिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येने येतात. येथील प्रदर्शनी जशी प्रसिद्ध आहे, तसाच रावण दहनाचा दसऱ्याच्या दिवशी होणारा आतषबाजीचा कार्यक्रमही डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. यंदा प्रदर्शनीत पहिल्या दोन दिवशी फारशी गर्दी नव्हती. मात्र दुसºया शनिवारी सुटी असल्याने गर्दीत वाढ झाली होती. चाकरमान्यांना सुटी असल्याने त्यांनी मुला-बाळांसह प्रदर्शनीचा आनंद लुटल्याचे चित्र दिसत होते. यंदा आकाशपाळणे, मौत का कुआं, पन्नालालचा शो आदी आकर्षणे यात आहेत. विशेष म्हणजे आयोध्या येथील रामलीला पाहण्यासाठीही काही वृद्ध मंडळी नियमित हजेरी लावत असल्याचे दिसत आहे.
शहरातील देवीच्या दर्शनासाठी व काकड आरतीसाठी महिला मोठ्या संख्येने सकाळच्या वेळी दिसून येत आहेत. यामुळे रस्ते गर्दीने फुलून जात आहे. शहरात ठिकठिकाणी बसलेल्या देवीच्या मंडपामध्ये अशी गर्दी दिसून येत होती.
दसरा महोत्सवात शनिवारी खेड्यातूनही मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग येत असल्याचे दिसून आले. बसेस व रेल्वेला गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील तरुणांचे लोंढे दसरा मैदानावरील प्रदर्शनीकडे कूच करताना दिसत होते. त्यामुळे या महोत्सवाला आता रंग चढत आहे.
याशिवाय शहरातील काही देवीच्या मंडळांनी यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले.अशा कार्यक्रमांनाही नागरिक हजेरी लावत आहेत. एक-दोन ठिकाणी दांडिया महोत्सवाचीही धूम सुरू झाल्याचे चित्र जाणवत आहे. यात आकर्षक वेशभूषा करून सहभाग घेतला जात आहे.
दसरा महोत्सवातील विविध क्रीडा स्पर्धांनाही प्रारंभ झाला आहे. यासाठी विविध समित्यांची स्थापना झाली असून त्याच्या तयारीसाठी या समित्या झटत असल्याचे दिसून येत आहे.