संपता संपेना औंढा बसस्थानकाची दैना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:08 AM2018-08-09T01:08:14+5:302018-08-09T01:08:43+5:30
ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या औंढा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच चिखल होत असल्याने अजूनही भाविकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. परिवहन मंडळाने यासाठी पाचवेळा कामाचे सर्वेक्षण करूनही नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रवाशांसह भाविक संताप व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या औंढा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच चिखल होत असल्याने अजूनही भाविकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. परिवहन मंडळाने यासाठी पाचवेळा कामाचे सर्वेक्षण करूनही नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रवाशांसह भाविक संताप व्यक्त करीत आहेत.
औंढा नागनाथ येथे परिवहन विभागाने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून जुने बसस्थानक बंद करून मंदिराच्या एकदम समोरासमोरच सन २००६ साली नवीन अद्ययावत बसस्थानक बांधकाम करून सोय करून दिली. येथे राज्यातून नाही तर संपूर्ण देशातूनच भाविक ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येतात. ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे काही वर्षे चांगली गेली; परंतु मंदिराच्या व बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासूनच अतिक्रमण झाले. त्यामुळे गावातील सांडपाण्यासाठी बांधलेल्या नाल्या बुजूनच टाकण्यात आल्या. नालीतून वाहणारे पाणी हे हिंगोली-परभणी राज्य रस्त्यावरून वाहू लागले. पर्यायाने या घाण पाण्याला दुसरीकडे जाण्याचा मार्गच नसल्याने थेट पाणी बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारातून बसस्थानकातून वाहत आहे. याबाबत सा.बां. विभागाकडे अनेकवेळा मागणी होवूनही काम होत नसल्याने संस्थानच्या वतीने स्वत: निधी खर्च करून मंदिराकडे येणाºया मार्गात सुधारण केली तसेच सा.बां.ने उशिरा का होईना बसस्थानकाला लागून नालीचे बांधकामास सुरूवात केली; परंतु सदरील कामाची देयकेच कंत्राटदारांना न मिळाल्याचे कंत्राटदार दोनवेळा अर्धवट काम सोडून निघून गेला. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला. त्यामुळे बसस्थानकात येणाºया पाण्याची समस्या मात्र सुटली नाही. बसस्थानकाचे वाहनतळ खोल झाले व रस्त्यांची उंची वाढल्याने परिवहन मंडळाने येथील वाहन तळाचेच काम करण्यासाठी पाचवेळा सर्वे केला आहे. याचे अंदाजपत्रकही तयार झाले. निधीही उपलब्ध झाला; परंतु प्रत्यक्षात कामच होत नाही. त्यामुळे येथे येणाºया प्रवासी व वाहनांना घाण पाण्यातूनच रस्ता काढावा लागत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.