निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी दारुवर नियंत्रणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:47+5:302020-12-23T04:25:47+5:30
वसमत : ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. वातावरण रंगत आहे. या रंगाचा बेरंग होणार नाही. यासाठी गावोगाव जाणारी ...
वसमत : ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. वातावरण रंगत आहे. या रंगाचा बेरंग होणार नाही. यासाठी गावोगाव जाणारी पार्सल दारु ग्रामीण भागाकडे राजरोस जात आहे. आचारसंहिता असली तरी दारू पोहचवणारी पथके थेट गावात जात आहेत. आता ही पार्सल दारू थोपविण्याचे अवघड आव्हान कोण स्वीकारणार हा प्रश्नच आहे.
वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहे. निवडणुकीचे वातावरण गावागावात तापत आहे. संभाव्य पॅनलच्या तयारीने वेग घेतला आहे. अत्यंत चुरशीच्या लढती होणार यात शंका नाही. निवडणुका शांततेत पार पडाव्यात ही सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यासाठी गावात निवडणूक काळात अवैध दारू जाणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र नेमके उलट घडत असल्याचे चित्र आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून वसमत शहरातील परवाना प्राप्त दारू विक्री केंद्रावरुन पार्सल दारू जाण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. भर बाजारपेठेतून दुचाकीवरुन दारूचे खोके घेऊन गावोगाव पथके जात आहेत. तसेच बाजारपेठेतील सीसीटीव्ही समोरुन राष्ट्रीय महामार्गाने पार्सल पोहचवणारे राजरोस गावोगाव जाऊन दारू पोहवचत असल्याने निवडणुकीच्या रंगात भंग होण्याची भीती व्यक्त होत आहे. गाव तिथे अवैध दारू विक्री हे अभियान दारू विक्रेत्यांच्या पार्सल सेवेमुळे यशस्वी झाले आहे. गावोगावचे पोलीस पाटील, बीट जमादार, दक्षता पथक, तंटामुक्ती समित्या, ग्रामरक्षक दले यापैकी कोणाचे पार्सल दारू गावात येत असतांना अडवत नाहीत. त्यामुळे गावोगाव दारुचा पूर वाहत आहे. आता १०६ ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार असल्याने निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. वातावरण निर्मितीसाठी दारुचा आधार घेण्याची मानसिकता वाढली आहे. त्यातूनच पार्सलची मागणी वाढली आहे. वसमत शहरातील परवाना प्राप्त दुकानावरुन दुचाकीवरुन दारुचे खोके घेऊन जाणारी दुचाकीस्वारांची फौज पाहिली तर निवडणुकीच्या कामात दारुचा मोठा वापर होत असल्याचे दिसते. उत्पादन शुल्क विभागाने तर पार्सल दारू विरोधात कारवाई न करण्याचे ठरवले असल्यासारखे चित्र आहे. मात्र किमान पोलीस ठाणे हद्दीत पार्सल पोहचणार नाही याची दक्षता संबंधित ठाणेदारांनी घेण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. वसमत ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच खांडेगाव शिवारात दुचाकीसह दारू पार्सलवर कारवाई केली. तरीही अजूनही पार्सल सुरूच आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पार्सल दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. वसमतमधील भर बाजारात असलेल्या परवानाप्राप्त दारू विक्री केंद्रावर निवडणूक काळात चित्रीकरण करण्याची गरज आहे. उत्पादन शुल्क विभागाने सीसीटीव्हीची सक्ती करण्याची गरज आहे. यामुळे अवैध पद्धतीने पार्सल दारू पाठवणाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. परवाना प्राप्त दारू विक्रेते पार्सल पुरवठा करणाऱ्यांना कारवाई होणार नाही याची खात्री असल्यानेच गावोगाव अवैध दारुचा पूर वाहत आहे. किमान ग्रामपंचायत निवडणूक काळात तरी दारू नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.
शहर, ग्रामीण ठाणेदारांसह डीवायएसपीही नवीन
वसमत शहर पार्सल दारू विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झाले आहेत. नवीन अधिकारी आल्यानंतर तरी परिणाम होईल अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप फरक दिसत नाही. ग्रामीण पाेलीस ठाण्याचे ठाणेदारही नवीन आहेत. त्यांनी एक पार्सल दुचाकी जप्त केली आहे. डिवायएसपीही नव्याने रुजू झाले आहेत. या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे. एलसीबीच्या पथकाला भर बाजारपेठेतून जाणारी दारू कशी दिसत नसावी हा प्रश्नच आहे.