पाणवठे उभारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:41 AM2021-02-27T04:41:04+5:302021-02-27T04:41:04+5:30
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा हिंगोली : शहरातील महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक परिसरात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत ...
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
हिंगोली : शहरातील महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक परिसरात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. दोन्ही बाजूंनी जनावरे बसत असल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा ही जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून येत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक परिसराचे डांबरीकरण करा
कळमनुरी : येथील बसस्थानक परिसराची दुरवस्था झाली आहे. यापूर्वीचे डांबरीकण उखडत असून, गिट्टी वर येत आहे. एसटीच्या चाकाखाली गिट्टी येऊन प्रवाशांना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसराचे पुन्हा डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
पॉलिथिन कॅरिबॅगचा वापर वाढला
हिंगोली: पॉलिथिन कॅरिबॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही काही व्यापारी पॉलिथिन कॅरिबॅगचा वापर करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पॉलिथिन वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बांधकाम साहित्य रस्त्यावर
हिंगोली: शहरात ठिकठिकाणी बांधकामे हाती घेण्यात आली आहेत. बांधकाम करण्यासाठी नागरिक बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकत आहेत. मात्र अनेक दिवस हे साहित्य तसेच पडून राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन जास्त दिवस बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.