ना जमीन ना नवऱ्याची सोबत; केवळ बचत गटाच्या साथीनेच केली महिलेने दारिद्र्यावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 06:47 PM2018-09-12T18:47:38+5:302018-09-12T18:48:55+5:30
घरी गुंठाभर जमीन नाही. पोटी मुल आले आणि पतीचे निधन अशा खडतर परिस्थितीत महिलेने केवळ बचत गटाच्या साथीने दारिद्र्यावर मात केली
सेनगाव : घरी गुंठाभर जमीन नाही. पोटी मुल आले आणि पतीचे निधन अशा खडतर परिस्थिती जीवन जगण्याचा संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील आडोळ येथील शेषेकला पिराजी चिंतारे या महिलेने बचत गट चळवळीतून संधीचे सोने करीत आपला जिवनाला यशस्वी उभारी देऊन महिलांसमोर आर्दश उभा केला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोली स्थापित स्वप्नपुर्ती लोकसंचलित साधन केंद्र सेनगाव अंतर्गत तालुक्यातील ३८ गावांत महिला स्वयं-सहाय्यता बचत गटाचे काम ११ वर्षापासून सुरु आहे. केंद्रांतर्गत येणारे व सेनगावपासून २० कि.मी.अंतरावरील गाव आडोळ. या गावात एक धाडसी व कर्तबगार महिला शेषेकला पिराजी चिंतारे यांनी पाच वर्षांपूर्वी सम्राट अशोक स्वंयसहायता महिला बचत गटाची स्थापना सहयोगिनी गंगासागर खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाने केली. चिंतारेबार्इंना दोन मुलं आहेत. पण नियतीने लहान मुलगा चार महिन्याचा असतानाच वडिलांचे छत्र हरवले. शेषेकलाने यांनी खंबीरपणे परीस्थीतीला सामोरे जाण्याचा निश्चय केला. पतीच्या वडिलांनी बांधलेल्या कुडाच्या घरात मोलमजुरी करुन संसाराचा गाडा ओढला.
टुमदार घर आणि बंदिस्त शेळी पालन
आज त्यांनी दोन्हीही मुले औंरगाबाद शहरात शिक्षणासाठी पाठविली. मोठा पदवी पूर्ण करुन गावाकडे आला. मुलाला काहीतरी व्यवसाय टाकून द्यावा, या उद्देशाने पुन्हा गटाला बँकेचे दोन लाखांचे कर्ज मिळाले. यातून तिने एक लाख व अंतर्गत कर्ज १५ हजार मिळून गावातच किराणा दुकान टाकून मुलाला रोजगार दिला. शासनाच्या इंदिरा आवास योजनेतून चार खोल्यांचे टुमदार घर बांधले आहे. शेषेकला यांना माविमने बंदीस्त शेळी पालनाचे प्रशिक्षण दिल्यामुळे त्या आधुनिक पध्दतीने शेळीपालन करतात. आज जे मिळविले ते केवळ बचत गटामुळे हे सांगायला, त्या कधीच विसरत नाही.
दोन शेळ्या व चार कोंबड्यांपासून केली सुरुवात
माविमच्या अतिगरीब व गरजू महिलांना गटात घेण्याच्या निकषात चिंतारे बसल्या. बचत गटात घेण्याची विनंती सहयोगीनीला केली. सुरुवातीला पन्नास रुपये बचतीपासून सुरुवात केली. सहा महिन्यांत त्यांना ४७ हजारांचे कर्ज मिळाले. शेषेकला यांनी त्यातून दोन शेळ्या व चार गावरान कोंबड्या विकत घेऊन व्यवसाय सुरु केला. पतीच्या नावावर गुंठाभर जमिनीचा तुकडा नाही. त्यामुळे पदरात अथांग गरिबी व पाठीवर दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी समर्थपणे पेलत आज टुमदार घरासह दोन मुºहा म्हशी, आठ शेळ्या आणि खंडीभर कोंबड्याचे साम्राज्य उभे केले आहे.