येलकीच्या केंद्रात लवकरच येणार नवीन वाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:27 AM2018-03-15T00:27:26+5:302018-03-15T00:27:40+5:30
येलकी येथील सशस्त्र सीमा बलाची ६५ क्रमांकाची वाहिनी परत गेली असली तरीही आता या बलाच्या महानिर्देशकांनी नवीन बटालियन पाठविण्याचा आदेश काढल्याची माहिती खा.राजीव सातव यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येलकी येथील सशस्त्र सीमा बलाची ६५ क्रमांकाची वाहिनी परत गेली असली तरीही आता या बलाच्या महानिर्देशकांनी नवीन बटालियन पाठविण्याचा आदेश काढल्याची माहिती खा.राजीव सातव यांनी दिली.
येलकी येथील सशस्त्र सीमा बल वाहिनीची ६५ क्रमांकाची वाहिनी येथून हलविण्याचा आदेश आल्यानंतर येलकी ग्रामस्थांनी खा.सातव यांना निवेदन दिले होते. सातव यांनी त्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह, गृहराज्यमंत्री किरण रिजीजू व सशस्त्र सीमा बलाचे महानिर्देशकांची भेट घेऊन नवीन बटालियन पाठविण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने १६ क्रमांकाची वाहिनी येलकीला पाठविण्याचा आदेश काढण्यात आला आहे. तर जम्मू येथून अॅडव्हान्स प्लाटूनही येलकीत दाखल झाली आहे. यामुळे हा प्रकल्प बंद पडणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
आगामी काळात या ठिकाणी भरती केंद्र सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे खा.सातव यांनी सांगितले. तसे झाले तर हिंगोली पोलीस दलाबरोबर सशस्त्र सीमा बलात रोजगाराची नवी संधी म्हणण्यापेक्षा देशसेवेची संधी मिळणार आहे. आपल्या परिसरातील मुलांना हे केंद्र नजीक राहणार असल्याने भरतीकडे कलही वाढू शकतो. भरती केंद्र व प्रशिक्षण केंद्र सुरू होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.