जलजीवन मिशनमध्ये होणार ३६१ गावांत नवीन योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:47+5:302021-07-18T04:21:47+5:30
हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या नव्या कामांना अजूनही प्रारंभ नाही. यापूर्वी तयार केलेला आराखडा आता रद्द झाला असून, नवीन आराखडा ...
हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या नव्या कामांना अजूनही प्रारंभ नाही. यापूर्वी तयार केलेला आराखडा आता रद्द झाला असून, नवीन आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये आता ३६१ गावांत पूर्णपणे नळयोजना नसल्याने, नवीन नळयोजना घेण्यासाठी आराखड्याला मंजुरी मिळाली. मात्र, या गावांतील योजनांचे अंदाजपत्रके तयार नाहीत. ते तयार करण्यासाठी संबंधित तालुक्यातील कनिष्ठ अभियंत्यांना आदेशित करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात दोन अभियंत्यांची यासाठी नियुक्ती केली आहे. यामध्ये जलस्रोत, पम्पिंग स्टेशन, उद्धरण वाहिनी, पाण्याची टाकी, अंतर्गत वितरण व्यवस्था आदी बाबींचा समावेश करून, दरडोई ५५ लीटर पाण्याची व्यवस्था करायची आहे. या नवीन योजना २०२४ पर्यंत पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये २५ लाखांपर्यंतची योजना जि.प. स्तरावर, २.५ कोटींपर्यंत अधीक्षक अभियंता, तर त्यापुढील मंत्रालय स्तरावर जाणार आहे. तसेही मंत्रालय छाननी समितीकडे सगळेच प्रस्ताव पाठवावे लागणार आहे. २,६८५ रुपये दरडोई खर्च येत असल्यास, जि.प.च्या स्तरावर मान्यता देण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यापुढे गेल्यास पुढील निकष पाळावे लागतात.
अनेक गावांत गेल्या अनेक वर्षांपासून योजनेची प्रतीक्षा आहे. त्यांना जलजीवन मिशनमध्ये आधार मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या विभागाची बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्यासाठी २० दिवसांची मुदत दिली. त्यात सध्या जलस्रोत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यावरूनच पुढील बाबींची निश्चितता होणार आहे.
२०७ गावांत नळजोडणीचे प्रस्ताव
आता दरडोई ४० ऐवजी ५५ लीटरचा निकष आल्यानंतर, अनेक गावांत नवीन कामे प्रस्तावित केली आहेत. यामध्ये नळजोडण्यांच्या कामांचाच समावेश आहे. ज्यांच्या नळजोडण्या शिल्लक राहिल्या, अशांना निधी दिला जाणार आहे. अशा ठिकाणी नवीन स्रोत किंवा वाहिनीची गरज असल्यास त्याचाही सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात ३०८ गावांत ४,६४६ नवीन नळजोडण्या, सेनगावातील २४ गावांत २,१६४, कळमनुरीतील ५० गावांत ७,३३८, औंढ्यातील ३८ गावांत ३,४४१, वसमत तालुक्यात ५७ गावांत ७,१६० नळजोडण्या प्रस्तावित आहेत. एकूण २४ हजार ७४९ नळजोडण्या प्रस्तावित आहेत.
नवीन नळयोजना प्रस्तावसंख्या
औंढा नागनाथ ६४
वसमत ७३
हिंगोली ८१
कळमनुरी ६४
सेनगाव ७९